महापालिकेकडूनच ‘जायका’ला विलंब
जलशक्ती मंत्रालयाचा ठपका; केंद्राला दिलेली मुदत आज संपणार

महापालिकेकडूनच ‘जायका’ला विलंब जलशक्ती मंत्रालयाचा ठपका; केंद्राला दिलेली मुदत आज संपणार

पुणे, ता. ९ : जागा ताब्यात नाही, निविदा अंतिम नाही, प्रकल्प गतीने राबविण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प अंमलबजावणी कक्षाची स्थापन केली नाही, यावरून महापालिकाच जायका प्रकल्पाला विलंब करीत असल्याचा ठपका केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने ठेवला आहे. दरम्यान, या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरूवात करण्यासंदर्भात महापालिकेने केंद्र सरकारला दिलेली मुदत उद्या (ता. १०) संपुष्टात येत आहे. मात्र, महापालिका अद्यापही निविदा प्रक्रियेतच अडकून पडली आहे.

जायका प्रकल्पासंदर्भात आढावा घेण्यासाठी १० डिसेंबर रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. खासदार गिरीश बापट, पर्यावरण सचिव आर. पी. गुप्ता, राष्ट्रीय नदीसुधार संचालनालयाचे संचालक आर. आर. मिश्रा, जायकाचे प्रमुख साइतो मित्सुनोरी आणि महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार उपस्थित होते. या बैठकीत शेखावत यांनी जायका प्रकल्पाचे काम सुरू करण्यासंदर्भात एक महिन्यांचा अल्टिमेटम महापालिकेला दिला होता. त्यांची मुदत उद्या संपुष्टात येत आहे. या बैठकीचे मिनिट्‌स ‘सकाळ’च्या हाती लागले आहेत. त्यावरून या बैठकीत शेखावत यांनी महापालिकेच्या कामकाजाबाबत
नाराजी व्यक्त करीत विलंब करीत असल्याचा ठपका ठेवला असल्याचे समोर आले आहे.

विलंबाचा ठपका का?
जायका प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत ३१ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे. यापूर्वी १० ऑगस्ट २०२१ रोजी या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने बैठक घेतली होती. यात प्रकल्पाचे कामकाज १० जानेवारीपर्यंत सुरू करू, असे आश्‍वासन महापालिकेने दिले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी चार महिन्यानंतर १० डिसेंबर रोजी बैठक आयोजिली होती. यात प्रकल्पासाठीच्या जागा ताब्यात घेणे, प्रकल्प राबविण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणे आणि निविदा प्रकिया पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. ऑगस्ट महिन्यांच्या बैठकीत महापालिकेने शब्द देऊनही डिसेंबरपर्यंत यापैकी कोणतीही कामे पूर्ण न केल्यामुळे शेखावत यांनी नाराजी व्यक्त करीत महापालिकेवरच विलंबाचा ठपका ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com