गुंठेवारीसाठी कसे आकारणार शुल्क? 
घरे नियमितीकरणाच्या प्रक्रियेला महापालिकेकडून आजपासून सुरवात

गुंठेवारीसाठी कसे आकारणार शुल्क? घरे नियमितीकरणाच्या प्रक्रियेला महापालिकेकडून आजपासून सुरवात

पुणे, ता. ९ : गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमितीकरणाच्या प्रक्रियेला महापालिकेकडून उद्यापासून (ता. १०) सुरवात होणार आहे. तुम्हाला या कायद्यांतर्गत घर नियमित करून म्हणजे कायदेशीर करून घ्यावयाचे असेल, तर त्यासाठी किती शुल्क भरावे लागेल आणि कशा प्रकारे घर नियमित करून घेता येईल, याची ही उदाहरणे

राज्य सरकारने गुंठेवारी कायद्यांतर्गत अशी घरे नियमित करून घेण्यासाठी दर निश्‍चित करून दिले. त्यानुसार किती शुल्क भरून आणि कशा प्रकारे घर नियमित करून घेता येईल, त्यांची ही उदाहरणे....

एनए (बिनशेती) करून घ्यावे लागणार
समजा तुम्ही उत्तमनगर येथे दोन गुंठे (२०० चौरस मीटर) जागा घेऊन विनापरवाना घर बांधले आहे. ते या कायद्यांतर्गत नियमित करून घ्यावयाचे असेल, तर सर्वप्रथम जमिनीचे एनए (बिनशेती) करून घ्यावे लागणार आहे. महापालिकेच्या हद्दीत त्याला जमीन विकसन शुल्क म्हटले जाते. शासनाने ठरवून दिल्यानुसार दोन गुंठे जागेचा रेडीरेकनरमधील दर हा २३ हजार १६० चौरस मीटर (२ हजार १५२ चौरस फूट) असा आहे. (शहराच्या वेगवेगळ्या भागात जमिनीचे वेगवेगळे दर आहेत. उदाहरणादाखल हा दर धरला आहे.)

विकसन शुल्क न भरता बांधकाम केले असेल तर
समजा, यापूर्वी तुम्ही मान्यता घेऊन बांधकाम केले असते, तर तुम्हाला २ हजार १५२ रुपयांच्या पाच टक्के म्हणजे १०७.६४ प्रति चौरस फूट या दराने विकसन शुल्क भरावे लागले असते. परंतु तुम्ही विकसन शुल्क न भरता बांधकाम केले असेल तर तुम्हाला तीनपट विकसन शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजे १०७.६४ च्या तिप्पट म्हणजे ३२२.९२ पैसे प्रतिचौरस फूट या दराने २ हजार १५२ चौरस फूट जागेचे सहा लाख ९५ हजार ४६ रुपये हे जमीन विकसन शुल्क करावे लागणार आहे.

बांधकाम केले असेल तर
त्यावर तुम्ही एक हजार ६०० चौरस फुटाचे बांधकाम केले असेल, जमीन विकास शुल्काव्यतिरिक्त त्या जागेवर जेवढे बांधकाम केले आहे, त्या बांधकामावर रेडी-रेकनरमध्ये जो जमिनींचा दर आहे, त्या दराच्या १० टक्के रक्कम ही दंड म्हणून आकारावी, असे शासनाने म्हटले आहे. म्हणजे तुम्ही दोन गुंठे जागेवर एक हजार ६०० चौरस फूट बांधकाम केले आहे. रेडी-रेकनरमध्ये तुमच्या जमिनींचा दर प्रति चौरस फूट एक हजार १५२ रुपये असा आहे. त्याच्या १० टक्के म्हणजे २१५ रुपये प्रति चौरस फूट या दराने एक हजार ६०० चौरस फूट बांधकामावर साधारणपणे तीन लाख ४४ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
याचा अर्थ जमिनी विकसन शुल्कापोटी सहा लाख ९५ हजार ४६ रुपये अधिक केलेल्या बांधकामावर १० टक्के दंडाने तीन लाख ४४ हजार रुपये असे मिळून १० लाख ३९ हजार ९६ रुपये इतका दंड महापालिकेकडे भरून घर नियमित करून घेता येणार आहे.

सामासिक अंतर सोडले नसल्यास
बांधकाम करताना नियमानुसार तुम्ही सामासिक अंतर (फ्रंट आणि साइड मार्जिन) सोडले नसेल, तर अधिकचा १० टक्के दंड आकारला जाणार आहे. तो तीन लाख ४४ हजार रुपये येतो. म्हणजे १३ लाख ८३ हजार ९८ रुपये तुम्हाला भरावे लागणार आहे. जर तुम्ही सामासिक अंतर सोडून बांधकाम केले असेल, तर १० टक्के दंड भरावा लागणार नाही.


मोकळ्या भूखंडाला किती शुल्क
समजा तुम्ही उपनगरात दोन गुंठे जागा घेऊन ठेवली आहे. परंतु, त्यावर कोणतेही बांधकाम केले नसेल आणि आता तुम्हाला त्या जागेवर कायदेशीर बांधकाम करावयाचे असे, अथवा गुंठेवारी कायद्यांतर्गत तो भूखंड नियमित करून घ्यायचा असेल, तर किती पैसे भरावे लागणार याचे हे उदा : दोन गुंठे जागा आहे. त्या जागेचा रेडीरेकरनमधील दर दोन हजार १५२ रुपये प्रतिचौरस फूट आहे. त्याच्या १५ टक्के म्हणजे ३२२.९२ पैसे या दराने सहा लाख ९५ हजार ४६ रुपये शुल्क भरून तो नियमित करून घेता येईल. त्यानंतर रीतसर बांधकामासाठी वास्तुविशारदामार्फत प्लॅन तयार करून अन्य शुल्क भरून कायदेशीर बांधकाम करता येणार आहे.

भूखंड नियमित; पण बांधकाम विनापरवाना
गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित झालेली जागा तुम्ही घेतली आहे. परंतु त्यावर विनापरवाना बांधकाम केले आहे. तर अशा प्रकारामध्ये तुम्ही असाल, तर किती दंड भरावा लागणार आहे. उदा : तुम्ही गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित केलेला दोन गुंठ्यांचा भूखंड खरेदी केला आहे. सामाजिक अंतर सोडून १६०० चौरस फूट बांधकाम केले आहे. आता या कायद्यान्वये बांधकाम नियमित करून घ्यावयाचे असेल आणि त्या जागेचा रेडीरेकनरमधील दर हा प्रतिचौरस फूट दोन हजार १५२ रुपये असा असेल, तर त्याच्या १० टक्के म्हणजे तीन लाख ४४ हजार रुपये शुल्क भरून ते बांधकाम नियमित करून घेता येणार आहे. सामासिक अंतर सोडले नसेल, तर आणखी १० टक्के म्हणजे तीन लाख ४४ हजार अधिक तीन लाख ४४ हजार असा सहा लाख ८८ हजार रुपये दंड भरून ते नियमित करून घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com