कन्व्हेयन्स डीडसाठी गृहनिर्माण सोसायट्यांची लूट

कन्व्हेयन्स डीडसाठी गृहनिर्माण सोसायट्यांची लूट

पुणे, ता. १३ : गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या जागेवरील मालकी हक्क मिळविण्यासाठी तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) किंवा कन्व्हेयन्स डीड प्रक्रिया पूर्ण करावी लागते. परंतु त्यासाठी सोसायट्यांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांना कन्व्हेयन्स डीड किंवा डीम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया करून घेणे अवघड होऊन बसले आहे. परिणामी शहरातील अनेक सोसायट्यांच्या जागांचा मालकी हक्क अद्याप संबंधित बिल्डरकडेच आहे.

बिल्डरकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गृहनिर्माण सोसायटीची नोंदणी केली जाते. त्यानंतर बिल्डरने सोसायटीला कन्व्हेयन्स डीडची प्रक्रिया करून देणे आवश्यक आहे. बऱ्याचदा बिल्डर आणि सोसायटीची तयारी असली तरी त्यांना कन्व्हेयन्स डीडसाठी अधिक पैसे द्यावे लागत आहेत. एका सदनिकेमागे किमान अडीच ते साडेतीन हजार रुपये शुल्क मागितले जाते. सोसायट्यांना सदनिकाधारकांकडून पैसे एकत्रित करून कन्व्हेयन्स डीड करून घ्यावे लागत आहे. परंतु सर्वच सोसायट्यांना ही रक्कम देणे अवघड जाते. त्यामुळे कन्व्हेयन्स डीडची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.


क्लिष्ट प्रक्रियेमुळे अडचणी
गृहनिर्माण सोसायट्यांना डीम्ड कन्व्हेयन्ससाठी जिल्हा उपनिबंधक (सहकार) आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो. सदनिकाधारकांच्या ‘इंडेक्स टू’सह दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त दाखल करावे लागतात. तलाठ्याकडे नाव नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबाऱ्यावर भोगवटादार म्हणून सोसायटीचे नाव नोंदविण्यात येते. सरकारी स्तरावर ही प्रक्रिया क्लिष्ट आहे. त्यामुळे सोसायट्यांना नाइलाजाने अधिक पैसे द्यावे लागत आहेत.


स्वतःच करा डीम्ड कन्व्हेयन्स (आवश्यक कागदपत्रे) :
गृहनिर्माण सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र
वार्षिक सभा किंवा विशेष सभेतील ठरावाची प्रत
मिळकत पत्रिकांचा तीन महिन्यातील उतारा, सर्व सदनिकाधारकांची यादी
सोसायटीने डीम्ड कन्व्हेयन्सबाबत बिल्डरला बजावलेली कायदेशीर नोटीस
दोन हजार रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाइन शुल्क
संस्थेची कागदपत्रे खरी असल्याबाबत अर्जदाराचे स्वप्रतिज्ञापत्र
बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र
भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेतल्याचे स्व-प्रमाणपत्र

ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ :
http://mahasahakar.maharashtra.gov.in

सोसायटीच्या कन्व्हेयन्स डीडसाठी कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाइन शुल्क लागते. या प्रक्रियेसाठी वकील नेमल्यास त्यांचे शुल्क आकारतात. शिवाय, जागेच्या एफएसआयनुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते. याव्यतिरिक्त कन्व्हेयन्स डीडसाठी अधिक खर्च येत नाही.
- नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक

गृहनिर्माण सोसायटीची नोंदणी करताना बिल्डरने सदनिकाधारकांकडून रक्कम घेतलेली असते. त्यामुळे कन्व्हेयन्स डीड करून देणे ही संबंधित बिल्डरची जबाबदारी आहे. कन्व्हेयन्स डीडसाठी जास्त खर्च येत नाही. परंतु त्यासाठी सोसायट्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा. कन्व्हेयन्साठी सोसायट्यांची होणारी लूट रोखण्याची गरज आहे.
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ


पुणे शहरातील सद्यःस्थिती (२०२१ अखेर)
गृहनिर्माण सोसायट्या : सुमारे १८ हजार ५००
दाखल प्रकरणे : सुमारे ४ हजार
डीम्ड कन्व्हेयन्स झालेल्या सोसायट्या : सुमारे ३ हजार
सुनावणीस असलेली प्रकरणे : २५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com