पहाटे पूर्व क्षितीजावर तेजस्वी शुक्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहाटे पूर्व क्षितीजावर तेजस्वी शुक्र
पहाटे पूर्व क्षितीजावर तेजस्वी शुक्र

पहाटे पूर्व क्षितीजावर तेजस्वी शुक्र

sakal_logo
By

फेब्रुवारी महिन्यात पहाटे पूर्व क्षितीजावर अतिशय तेजस्वी स्वरूपात शुक्र दिसेल. मुळातच शुक्र नेहमी तेजस्वी दिसतोच; मात्र या महिन्यात तो जरा जास्त पृथ्वीजवळ आल्याने परम तेजस्वी दिसेल. येत्या ९ तारखेला शुक्राची तेजस्विता उणे ४.९ होत असल्याने त्याचे बिंब अतिशय ठळक दिसेल. शुक्राच्या देखील चंद्राप्रमाणे कला दिसतात. गेल्या महिन्यात त्याची सूर्याबरोबर युती झाली व त्यावेळी शुक्राची अप्रकाशित बाजू आपल्याकडे होती. युतीनंतर तो पूर्व क्षितीजावर दाखल झाला असून हळूहळू त्याच्या बिंबाचा प्रकाशित भाग वाढू लागल्याने त्याची चंद्राप्रमाणे कोर दिसू लागली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शुक्राचे बिंब काहीसे मोठे व १६ टक्के प्रकाशित दिसेल. येत्या ९ तारखेला शुक्राच्या बिंबाचा २३ टक्के भाग प्रकाशित होत असून तो अतिशय तेजस्वी दिसू लागेल. थोडक्यात शुक्राचे पृथ्वीजवळ येणे व त्याच्या बिंबाचा चतकोर भाग प्रकाशित होणे यामुळेच शुक्र परम तेजस्वी दिसू लागला आहे. शुक्र इतका तेजस्वी अजून सव्वा वर्ष म्हणजे जुलै २०२३ पर्यंत दिसू शकणार नाही.

ग्रह ः
बुध : पूर्व क्षितीजावर सूर्योदयापूर्वी बुध दिसत आहे. तो सूर्यापासून दूर होत क्षितीजावर उंच चढताना दिसेल. या काळात तो तेजस्वी होताना दिसेल. या महिन्याच्या १७ तारखेला बुध सूर्यापासून दूरात दूर अशा २६ अंशावर पोचेल. यावेळी त्याची तेजस्विता उणे ०.१ एवढी होत असल्याने तो सहजपणे दिसू शकेल. बुधाच्या वरच्या बाजूस तेजस्वी शुक्र व तांबूस मंगळ दिसेल. यानंतर बुध पुन्हा सूर्याकडे सरकू लागेल. महिनाअखेरीस तो क्षितीजाजवळ पोचत असून त्याच्याजवळ पिवळसर रंगाचा शनी दिसेल.

शुक्र : सूर्योदयापूर्वी जवळजवळ दोन तास शुक्र दक्षिण पूर्वेस उगवताना दिसेल. तो क्षितीजावर उंच चढत २५ अंशापर्यंत पोचेल. महिन्याच्या प्रारंभी त्याचे बिंब ४९ विकलांचे व १६ टक्के प्रकाशित दिसेल. महिन्याभरात शुक्राच्या बिंबाचा प्रकाशित भाग वाढत जाईल व ९ फेब्रुवारीला तो परम तेजस्वी दिसू लागेल. शुक्राची ही तेजस्विता या वर्षातील सर्वात मोठी तेजस्विता असेल. या महिन्याच्या प्रारंभी पहाटे पाचच्या सुमारास उगवणारा शुक्र लवकर लवकर उगवत जात महिना अखेरीस चारच्या सुमारास उगवताना दिसेल. यावेळी तेजस्वी शुक्राच्या खालच्या बाजूस नारिंगी रंगाचा मंगळ दिसेल.

मंगळ ः दक्षिण पूर्वेस मंगळ पहाटे पावणेपाचच्या सुमारास उगवताना दिसेल. तो धनू राशीत दिसत असून त्याच्या डाव्या हातास तेजस्वी शुक्र दिसत आहे. हे दोन ग्रह एकमेकालगत राहून धनू राशीत सरकताना दिसतील. मंगळ आपल्यापासून ३१ कोटी कि.मी. दूर असून त्याचे बिंब अवघे ४.५ विकलांएवढे दिसत आहे. मंगळाची तेजस्विता १.३ असेल. चंद्राजवळ मंगळ २७ तारखेला असेल. जवळच शुक्र
देखील असल्याने या तिघांचा छानसा त्रिकोण दिसू लागेल.

गुरू ः या महिन्यात गुरू पश्‍चिम क्षितीजालगत संध्याकाळी दिसेल. तो सूर्याकडे सरकत असल्याने लवकर मावळत जात संधी प्रकाशात नाहीसा होईल. पुढील महिन्यात ५ तारखेला त्याची सूर्याबरोबर युती होत आहे. गुरू आपल्यापासून ८८ कोटी कि.मी. अंतरावर आहे. गुरूचे ३३ विकलांचे बिंब उणे दोन तेजस्वितेचे दिसेल. चंद्रकोरीजवळ गुरू २-३ तारखेला दिसेल.

शनी ः सूर्य सानिध्यामुळे शनी या महिन्यात दिसू शकणार नाही. फेब्रुवारीच्या अखेरीस पहाटे पूर्व क्षितीजावरच्या बुधाजवळ शनी दिसू लागेल.

युरेनस-नेपच्यून ः युरेनस पूर्वरात्री मेष राशीत दिसेल. तो या राशीच्या २९ क्रमांकांच्या ताऱ्‍यालगत दिसेल. युरेनसची तेजस्विता ५.८ असेल. नेपच्यून देखील पूर्व रात्री कुंभ राशीतील पूर्वेकडच्या भागात दिसेल. तो या राशीच्या फाय ताऱ्‍याजवळ दिसत असून त्याची तेजस्विता ८.० आहे.

चंद्र-सूर्य ः पौष अमावस्या १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.१६ वाजता होत असून माघ पौर्णिमा १६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.२६ वाजता होईल. चंद्र पृथ्वीपासून दूर (४,०४,८९६ कि.मी.) ११ फेब्रुवारी रोजी असेल तर पृथ्वीजवळ (३,६७,७८९ कि.मी.) २७ फेब्रुवारी रोजी असेल. सूर्य कुंभ राशीत असेल.

ग्रह कधी व कोठे पहाल ?
संध्याकाळचे आकाश ः पश्‍चिमेस - गुरू - महिन्याच्या प्रारंभी
पश्‍चिम - युरेनस, नेपच्यून
मध्यरात्रीचे आकाश ः पश्‍चिमेस - युरेनस
पहाटेचे आकाश ः पूर्वेस - शनी व बुध
दक्षिण पूर्वेस - शुक्र व मंगळ

- डॉ. प्रकाश तुपे

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top