रेशन दुकानांना आयएसओ मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेशन दुकानांना आयएसओ मानांकन
रेशन दुकानांना आयएसओ मानांकन

रेशन दुकानांना आयएसओ मानांकन

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : रेशन दुकानांमध्ये स्वच्छता, ग्राहकांना चांगल्या दर्जाचे धान्य, आकर्षक मांडणी, वेळेवर धान्य वितरण, कोणत्या योजनेंतर्गत किती धान्य प्राप्त झाले, याची माहिती रेशन दुकानांमध्ये फलकावर उपलब्ध झाल्यास नवलच. तसेच, रेशन दुकानचालक चक्क गणवेशात असल्यास आश्चर्य वाटायला नको. परंतु, आता ही बाब प्रत्यक्षात साकारणार आहे. ग्राहकांना या सर्व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या रेशन दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त होणार आहे. त्यादृष्टीने पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील रेशन दुकानचालकांनी तयारीही सुरू केली आहे.

रेशन दुकानदारांनी स्वयंप्रेरणेतून स्वत:च्या दुकानात ग्राहकांना उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या अनुषंगाने आवश्यक सुधारणा व्हाव्यात, या उद्देशाने अन्नधान्य पुरवठा विभागाने संबंधित संस्थेमार्फत रेशन दुकानांना आयएसओ मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांची तपासणी करून दुकानचालकांना मार्गदर्शनही करण्यात येत आहे.

काय बदल होणार?
१) केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेंतर्गत रेशन दुकानात दर महिन्याला किती गहू, तांदूळ उपलब्ध झाला, याची माहिती दुकानात फलकावर दर्शनी भागात लावली जाईल.
२) अनावधनाने निकृष्ट दर्जाचे धान्य मिळाल्यास संबंधित दुकानदारांनी ग्राहकांना ते वाटप न करता गोदामातून बदलून घेणे आवश्यक आहे.
३) ग्राहकांची काही तक्रार असल्यास फलकावर दक्षता समितीचे पदाधिकारी आणि अन्नधान्य वितरण कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक असतील.
४) दुकानचालकांना स्वच्छतेसोबतच उंदरांकडून होणारी धान्याची नासाडी रोखण्यासाठी पिंजरेही ठेवावे लागणार आहेत.
५) दुकानाचे रंगकाम, शॉप ॲक्ट परवाना, नूतनीकरण, अन्न व औषधी प्रशासन कार्यालयाचा परवाना दर्शनी भागात लावावा लागणार आहे.
६) अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही, प्रथमोपचार पेटी, ग्राहकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, पिण्यासाठी पाणी, सॅनिटायझर अशा सुविधाही पुरविण्यात येणार.

रेशन दुकानदारांना मार्गदर्शन
रेशन दुकानांना आयएसओ मानांकन मिळवून रेशन दुकानदारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात योजना राबविण्यात येत आहे. रेशन कार्डधारकांना दर्जेदार सेवा मिळावी या हेतूने विभागीय, तालुकानिहाय कार्यालयीन स्तरावर बैठका घेण्यात आल्या. पुणे
शहरातही अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले आणि नायब तहसीलदार गजानन देशमुख यांच्याकडून रेशन दुकानदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.


रेशन दुकानांची संख्या
७१८
पुणे, पिंपरी चिंचवड शहर

१८२३
पुणे जिल्हा ग्रामीण

सरकारच्या निर्णयाने रेशन दुकानचालकांचा सन्मान वाढणार आहे. नागरिकांचा रेशन दुकानांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्या अनुषंगाने सर्व रेशन दुकानदार प्रयत्नशील आहेत. राज्य सरकारने ग्राहकांना सुविधा करून देणाऱ्या रेशन दुकानदारांच्या उत्पन्न वाढीबाबत विचार करावा, ही अपेक्षा आहे.
- गणेश डांगी,
अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे

ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा देणे, हा आयएसओ मानांकनाचा उद्देश आहे. रेशन दुकानचालकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. रेशन दुकानांसोबतच अन्नधान्य वितरण कार्यालये, परिमंडळ कार्यालयांमध्येही स्वच्छता, अद्ययावत रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी कार्यप्रणाली निश्चित करणार आहे.
- सचिन ढोले,
अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top