परिस्थिती निवळताच स्पर्धा घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिस्थिती निवळताच स्पर्धा घ्या
परिस्थिती निवळताच स्पर्धा घ्या

परिस्थिती निवळताच स्पर्धा घ्या

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ जानेवारीपासून सुरू होणार असलेली साठावी राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाबाबत कलाकारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना हा निर्णय झाल्याने कलाकारांनी काहीसे नाउमेद झाले असल्याची भावना व्यक्त केली, मात्र दुसरीकडे काही संघांमधील कलाकारांनाच कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत नाटकाचा प्रयोग करणे शक्य नसल्याने या संघांनीच स्पर्धा रद्द करण्याची मागणी सरकारला केली होती. या मागणीचा विचार करून स्पर्धा पुढे ढकलल्याने समाधान देखील व्यक्त करण्यात आले. सरकारने हा निर्णय जाहीर करताना परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे सांगितले आहे. त्याला अनुसरून परिस्थिती निवळल्यानंतर लवकरात लवकर स्पर्धेचे आयोजन व्हावे, अशी मागणीही काहींनी केली आहे.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्ग वाढत होता. या परिस्थितीत कलाकारही तालमीला येण्यासाठी घाबरत होते. तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टिस्ट व कलाकार असे मिळून १४-१५ जणांचा संघ होता. इतक्या प्रमाणात एकत्र येऊन तालीम करणे, सर्वांनाच धोकादायक वाटत होते. त्यातच काही कलाकारांचा तब्येत खालावल्यावर अजूनच भीती निर्माण झाली. त्यामुळे तालीम थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच सरकारकडेही आम्ही स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पुण्यातील सर्वच संघांशी याबाबत चर्चा केली होती. सरकारने विनंती मान्य केल्याने समाधानी आहोत.
- गणपत कांबळे, अध्यक्ष, इप्टा

कोरोनाचा धोका लक्षात घेता सरकारने हा घेतलेला निर्णय योग्य आहे असे वाटते. भीतीच्या सावटाखाली प्रयोग करणे कोणालाच शक्य झाले नसते. ते प्रयोग रंगलेही नसते. मात्र सरकारकडे आमची एकच विनंती आहे. एरवी या क्षेत्राच्या बाबतीत सरकार काहीसे उदासीन असते. सगळे बंद झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यास वेळ लागतो. आत्ताही तसे झाल्यास स्पर्धा खूप काळ लांबेल. आधीच दोन वर्षे स्पर्धा झाली नसताना ते कलाकारांना परवडणारे नाही. त्यामुळे ही परिस्थिती निवळल्यानंतर लवकरात लवकर स्पर्धेचे आयोजन व्हावे.
- संतोष माकुडे, लेखक-दिग्दर्शक, योगेश पार्क सहकारी गृहरचना संस्था

आमच्या तीन कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती आणि आमचा १५ जानेवारीलाच प्रयोग होता. त्यामुळे चार दिवसांच्या कालावधीत बदली कलाकार घेऊन प्रयोग करणे शक्यच नव्हते. त्यामुळे स्पर्धा पुढे ढकलली, हे उत्तमच झाले. मात्र आत्ता सर्वच संघांची तयारी झाली होता. पुन्हा नवीन वेळापत्रक जाहीर होईल, तेव्हा नव्याने तालमी कराव्या लागतील. बरीच गुंतवणूक पुन्हा करावी लागेल. त्याचा विचार करता सरकारने खर्चाचा परतावा देण्याचा अथवा सरकारतर्फे देण्यात येणारी खर्चाची रक्कम वाढवून देण्याचा विचार करावा.
- सुनील चौधरी, लेखक-दिग्दर्शक, अवकाश कलामंच संस्था

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top