आंधळी पाण्याला गेली अन् घागर फोडून घरी आली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंधळी पाण्याला गेली 
अन् घागर फोडून घरी आली
आंधळी पाण्याला गेली अन् घागर फोडून घरी आली

आंधळी पाण्याला गेली अन् घागर फोडून घरी आली

sakal_logo
By

घड्याळात दहाचे ठोके पडताच पल्लवीच्या ह्रदयाचेही ठोकेही जलद पडू लागले. ‘आजही वेळेवर ऑफिसला पोचले नाही तर आपलं काय खरं नाही’ या कल्पनेने तिला घाम फुटला. तिने धावपळीतच डबा भरला. कानात झुमके घातले, कानाला मास्क अडकवला, चष्म्याच्या काड्या कानावर ठेवल्या, एअरफोन कानात घातला. पर्स उचलली. ‘आता तीसुद्धा कानाला अडकावी काय?’ असा गंमतीशीर विचार तिच्या मनात आला. त्यामुळे ती खुदकन हसली. मग लगबगीने ती पार्किंगमध्ये आली. ‘आपल्या गाडीचे ब्रेक फार झिजले आहेत. कितीही अर्जंट लावले तरी गाडी थांबतच नाही. एक-दोन दिवसांत ते बदलले पाहिजेत,’ असं चपलांकडे पहात ती स्वतःशीच म्हणाली. त्यानंतर गाडी स्टार्ट करून ती वेगाने चालवू लागली. रस्त्याने एकजण पुढे चालला होता. त्याला धडकण्याच्या बेतात ती होती. ‘‘रस्त्याने नीट चालता येत नाही का? मागून मी धडकले असते ना.’’ पल्लवी त्याच्यावर ओरडली.
‘‘माझ्या पाठीला काय डोळे आहेत का।’’ त्या माणसानेही प्रत्युत्तर दिले. यावर पल्लवी चांगलीच चिडली. ‘‘तुम्हाला पाठीमागे बघून, पुढे चालता येत नाही का? उगाचंच दुसऱ्याचा वेळ वाया घालवायचा. एकतर आधीच मला उशीर झालाय? मला लेटमार्क मिळाल्यावर त्याला कोण जबाबदार? एकतर चालताना शिस्त पाळायची नाही आणि दुसऱ्याला वर शहाणपणा शिकवायचा. पण मी का तुमच्याशी वाद घालत बसलेय.’’ असे म्हणून तिने गाडी पुन्हा सुसाट सोडली. ऑफिसला पोचायला आता फक्त पंधराच मिनिटे शिल्लक राहिली होती. थोडं पुढे गेल्यावर तिची गाडी बंद पडली.
‘‘बाप रे ! पेट्रोल संपलेलं दिसतंय,’’ असे म्हणून ती शेजारच्या पेट्रोलपंपाकडे गाडी ढकलू लागली. तिथे गाड्यांची लागलेली रांग पाहून, तिच्या पोटात गोळा आला.
‘‘भैय्या, मै जरा घाई मे हूँ ! जरा जलदी उरको ना.’’ पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यास तिने विनंती केली. पण त्या कर्मचाऱ्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. थोडावेळ असाच गेला. रांग थोडीसी पुढे सरकली होती.
‘‘भैय्या, मेरे ऑफिस में एक तातडी की मिटिंग है! मुझे उशीर हो रहा है! तुम पटापट हात चलाव ना. इधर-उधर घुम्यासारखे मत देखो. उगाचंच टाईम वाया जाता है,’’ पल्लवीने त्या कर्मचाऱ्याला म्हटले.
‘‘ताई, फक्त पाच मिनिटे थांबा.’’ त्या कर्मचाऱ्याने शुद्ध मराठीत म्हटले.
‘‘तुमको मराठी बोलने को आता है व्हय! पहले बताने का ना?’’ पल्लवीने म्हटले. पुढच्या दहा मिनिटांत तिचा नंबर आला. मात्र, तिच्या गाडीकडे तो कर्मचारी बघतच बसला.
‘‘ताई, तुमची गाडी इलेक्ट्रिक आहे हो. तिला पेट्रोल चालत नाही.’’ त्याचं बोलणं ऐकून पल्लवी त्याच्यावर भडकली.
‘‘हे तुम्हाला आधी सांगता येत नाही का? माझी वीस मिनिटे वाया गेली ना. गेल्याच आठवड्यात माझ्या नवऱ्याने मला ही इलेक्ट्रिक गाडी गिफ्ट दिली आहे. मला गाडीची अजून सवय नसल्याने मी कन्फ्युज झाले. बरं थोडं-फार पेट्रोल टाकून ऑफिसपर्यंत मला जाता येईल का?’’ पल्लवीने शंका व्यक्त केली. त्यावर कर्मचाऱ्याने हात जोडले.
‘‘ताई ! असं काही करता येत नाही. तुम्ही साइडला गाडी घेता का?’’ पल्लवीने गाडी बाजूला घेतली. ढकलतच ती थोडी पुढे आणली व तेथूनच नवऱ्याला फोन लावला.
‘‘अहो, असली कसली गाडी घेतलीय? रस्त्यातच बंद पडली. तुम्ही आताच्या आता मला ऑफिसला सोडायला या.’’ असं म्हणून तिने फोन कट केला. आता बॉसला उशिरा येण्याचं काय कारण सांगावं? या गहन विचारात ती पडलीय.