
रमजान - पठाण
गुलामांना मुक्त करणे
म्हणजेच स्वर्गप्राप्ती
त्याकाळी साऱ्या जगभर गुलामगिरीचा सैतान थैमान घालीत होता. अरबस्तानामध्ये गुलामांची एक निराळीच जात समजली जात असे. गुलामाशी सहानुभूतीचे एक-दोन शब्द बोलणे जेथे पाप समजले जाई तेथे त्यांच्या कल्याणाची गोष्ट काढणे वेडगळपणाचे ठरल्यास आश्चर्य नाही. त्याकाळी गुलामांचे होणारे हाल वाचले म्हणजे अंगावर शहारे आल्याखेरीज राहात नाहीत.
गळ्याभोवती एक लोखंडाची पट्टी किंवा कडे ही गुलामांची खूण समजली जात असे. गुलामांचे घोळके करून त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जनावरांसारखे हाकून नेण्यात येई. जनावरही खाणार नाही अशा तऱ्हेचे अन्न त्यांना दिले जात असे. रात्री झोपताना त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्या जात असत आणि एक लांब साखळी त्यांच्या गळ्यातील पट्टीत अडकविली जाई.
जीव असलेला पण वाचा नसलेला, हृदय असलेला पण, समर्थ नसलेला असा दुर्देवी प्राणी भूतलावर कोठे आढळेल काय? असा प्रश्न कोणी केला तर त्या प्रश्नास उत्तर म्हणून गुलामांकडे बोट दाखवावे लागेल. वाचा असून बोलता येत नसल्यामुळे टपकणाऱ्या अश्रूंनी आपल्या हालअपेष्टांचे वर्णन करणाऱ्या गुलामांकडे पाहून हजरत महमूद पैगंबरांचे अंतःकरण कळवळे. या गुलामांना स्वतंत्र केल्याखेरीज समाजाचा उत्कर्ष कदापीही होणार नाही असा विचार हजरत पैगंबरांच्या मनात येऊन त्यांनी गुलामांना स्वातंत्र्य द्या असा पुकारा केला. गुलामांभोवती करकचून आवळलेली सामाजिक बंधने तोडून टाकून त्यांना आपली जीवनयात्रा सुखकर करू द्या, असा हजरत पैगंबरांनी जनतेस जाहीर उपदेश केला. गुलामास मुक्त करून त्यांना स्वातंत्र्य देणे महत् पुण्य आहे, असे त्यांनी जनतेच्या अंतःकरणावर बिंबवले. एकदा एक गृहस्थ हजरत पैगंबरांकडे आले व म्हणाले, ‘‘नरकापासून मुक्त होऊन स्वर्गप्राप्ती होण्याचा मार्ग कोणता?’’ हजरत पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘गुलामांना मुक्त करणे हाच मार्ग आहे!’’ गुलामांना स्वातंत्र्य देणे म्हणजे मुक्ती मिळविणे होय अशी घोषणा करून मानवतेच्या इतिहासात हजरत पैगंबरांनी जगामधील सर्वश्रेष्ठ सामाजिक सुधारणा केली आहे.
(लेखक माजी कुलगुरू आहेत.)
इफ्तार ६.५६ (शुक्रवारी सायंकाळी)
सहेरी ४.५१ (शनिवारी पहाटे)
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..