
कोव्हॅक्सिन लशीचे डोस उपलब्ध
पुणे, ता. १५ : कोव्हॅक्सिन लशीचा तुटवडा निर्माण झाल्याने मंगळवारी शहरात हे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मात्र, महापालिकेला राज्याकडून दहा हजार लशीचे डोस मिळाले असल्याने बुधवारी (ता. १६) ५४ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
कोव्हॅक्सिन लशीची मागणी वाढली आहे. पण, त्या प्रमाणात लशीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पुण्यात लशीचा खडखडाट झाला होता. त्याचा थेट परिणाम कोव्हॅक्सिनची लसीकरण केंद्र बंद करावी लागली. केंद्र सरकारने तीन लाख डोस राज्य सरकारला दिले. त्यापैकी पुणे महापालिकेसाठी दहा हजार लशीचे वितरण करण्यात आले. त्यामुळे बुधवारी लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होईल, असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
पुण्यात बुधवारी एकूण ५४ केंद्रांवर ८ हजार १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये ६० वर्षे आणि त्यापुढील वयोगटासाठी ११ ठिकाणी, १५ ते १८ वयोगटातील ४० महापालिकेचे आणि तीन सरकारी असे ४३ ठिकाणी लसीकरण उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्वच ठिकाणी प्रत्येकी १५० डोस उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
दोन तीन दिवसानंतर पुढे काय?
कोव्हॅक्सिन लसीचा एकूणच तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरेशा लसी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कोव्हॅक्सिन लशीच्या केंद्रांची संख्या १८० वरून आता केवळ ४०-४५ केंद्रांपर्यंत कमी झाली. सुरुवातीला एका केंद्रावर ५०० डोस ठेवण्यात येत होते. आता ही संख्या १०० ते १५० डोसपर्यंत कमी करावी लागली आहे. कोव्हॅक्सिनचा पुरवठा झालेली लस पुढील एक ते दोन दिवस पुरेल. त्यानंतर पुन्हा काय, असा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना पडला आहे.
........
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..