बार्टीच्या ताब्यात त्वरित जागा देण्याचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बार्टीच्या ताब्यात त्वरित
जागा देण्याचा आदेश
बार्टीच्या ताब्यात त्वरित जागा देण्याचा आदेश

बार्टीच्या ताब्यात त्वरित जागा देण्याचा आदेश

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः कोरोना संसर्गाच्या काळात कच्च्या कैद्यांना तात्पुरत्या कारागृहासाठी देण्यात आलेली येरवडा येथील मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या जागेवर आता सरकारी सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठीची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ही जागा त्वरित डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या ताब्यात द्यावी, असा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
येरवडा येथे महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतीगृह व क्रांतिज्योती सावित्री बाई फुले मुलींचे वसतीगृह आहे. या दोन्ही वसतिगृहाच्या जागेवर येरवडा कारागृहातील कैद्यांसाठी कोरोना उपचार केंद्र सुरु करण्यात आले होते. त्यामुळे हे दोन्ही वसतीगृह हे तात्पुरते कारागृह म्हणून घोषित करण्यात आले होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची शाळा सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा राज्य सरकारचा आदेश बार्टीला मिळाला आहे.
याशिवाय नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्यावतीने बार्टी संस्थेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी सर्वांगिण विकासाचे प्रशिक्षण सुरु केले जाणार आहे. या शाळेसाठी पर्यायी जागेची व्यवस्था उपलब्ध नाही. ही शाळा निवासी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ही जागा बार्टीच्या ताब्यात देण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिला आहे.