
पुणे पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील तीन हजार सराईतांची झडती
पुणे, ता. १ : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (ता. २८) मध्यरात्री गुन्हेगारांच्या तपासासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यात २ हजार ९२४ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून, ६१४ जण त्यांच्या वास्तव्याच्या मूळ पत्त्यावर आढळून आले. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी या कारवाईमध्ये धारदार शस्त्रे, गावठी दारू, अमली पदार्थ, असा मुद्देमाल जप्त केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ही मोहीम राबविली. पोलिसांनी या कारवाईत शहराच्या वेगवेगळ्या भागातील लॉज, हॉटेलची तपासणी केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर परिसरात कारवाई करून एकास अटक करून चार किलो गांजा जप्त केला. तर गावठी दारू विक्री करणाऱ्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून ३० लिटर गावठी दारू जप्त केली. तसेच ४१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सागर पाटील, नम्रता पाटील, रोहिदास पवार, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.