
राज ठाकरे यांच्या हस्ते पसायदान शिल्पाचे प्रकाशन
पुणे, ता. १ ः नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेतर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पसायदान शिल्पाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यानंतर आळंदी येथील नामदेव शिंपी धर्मशाळेस पसायदान शिल्प भेट देण्यात आले.
शिल्पकार अशोक काळे यांनी हे शिल्प साकारले आहे. प्रकाशन करण्यापूर्वी ठाकरे यांनी पसायदान शिल्पाचे पूर्ण वाचन केले. यावेळी नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेतर्फे त्यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष संजय नेवासकर, पुणे शहराध्यक्ष संदीप लचके, सचिव सुभाष मुळे, उपाध्यक्ष सोमनाथ मेटे, मुख्य समन्वयक प्रशांत सातपुते, सहसचिव विजय कालेकर, खजिनदार अक्षय मांढरे, सल्लागार सुभाष पांढरेकामे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे, पुणे शहर संघटक प्रल्हाद गवळी, मनसे विधी समितीचे शहराध्यक्ष अॅड. सतीश कांबळे आदी उपस्थित होते.