देशमुखांच्या वेळेस चूक झाली; मलिकांचा राजीनामा घेणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुखांच्या वेळेस चूक झाली; मलिकांचा राजीनामा घेणार नाही
देशमुखांच्या वेळेस चूक झाली; मलिकांचा राजीनामा घेणार नाही

देशमुखांच्या वेळेस चूक झाली; मलिकांचा राजीनामा घेणार नाही

sakal_logo
By

पुणे, ता. १ : ‘‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावेळेस जी चूक झाली, ती पुन्हा होणार नाही. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही,’’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्ष मलीक यांच्या पाठीशी उभा असल्याचे मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी परिसंवाद कार्यक्रमासाठी पाटील पुण्यात आले होते. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मलीक यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘रोज उठून कोणावरही आरोप करायचे आणि राजीनामे मागायचे असे चालणार नाही. आधी त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध होऊ द्या; मग राजीनाम्याचे बघू. देशमुख यांच्याबाबत जे घडले नाही, ते दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही एक राजीनामा दिला. आता राजीनामा नाही.’’ भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर विचारले असता ते म्हणाले, ‘‘सोमय्या यांच्यावर न बोललेले बरे,’’ असे सांगून अधिक बोलणे त्यांनी टाळले

राज्यपालांचे विधान योग्य नाही
दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहिती आहे. औरंगाबाद न्यायालयाने देखील त्यावर निर्णय दिला आहे. त्यामुळे अशा गोष्टी बोलणे टाळायला हवे. ते महाराष्ट्राचे हेड आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य नाही.’’

केंद्राने लक्ष दिले नाही
युक्रेन येथील विद्यार्थ्यांबाबत पाटील म्हणाले, ‘‘अनेक पालक अन मुलाशी बोलणे सुरू आहे. दुर्दैवाने एकाच मृत्यू झाला, केंद्र सरकारला दोन आठवड्यांपूर्वी भारतीय नागरिकांना व विद्यार्थ्यांना बोलावून घेण्याची कल्पना दिली होती, मात्र केंद्राने जास्त लक्ष दिले पाहिजे होते. केंद्राच्या निर्णयाबाबत तिथल्या नागरिकांचे समाधान झाले नाही, याचा अर्थ आपण कमी पडतो असे वाटते.’’

परिसंवाद यात्रेला प्रतिसाद
राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून पाटील म्हणाले, ‘‘महापालिका निवडणूकीसाठी आघाडीबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल. मात्र अद्याप चर्चा झालेली नाही. ती झाल्यानंतर मी त्यावर आपली मत व्यक्त करेल.’’