
खेळाडू विद्यार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत प्रस्ताव द्यावे
पुणे, ता. ४ : दहावी-बारावीच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या परिक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा सवलत गुणांसाठी २५ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले.
शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण यांना १५ ते २५ मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा. दहावीच्या परिक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवी आणि आठवीमध्ये असताना क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय सहभाग आणि प्रावीण्य मिळविले असल्यास, त्यातील सर्वोच्च कामगिरीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
तर बारावीची परीक्षा देणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांनी इयत्ता नववी आणि दहावीत असताना क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्रावीण्य मिळविले असल्यास ते प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहणार आहे. परंतु विद्यार्थी खेळाडूने दहावीत संबंधित प्रमाणपत्रावर क्रीडा सवलत गुण घेतले असल्यास यावर्षी तो क्रीडा सवलत गुण घेण्यास पात्र असणार नाही.
एकविध खेळ संघटना क्रीडा संचालनालयाने मान्यता दिलेल्या राज्यस्तर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील सहभागी व प्रावीण्य खेळाडूच क्रीडा सवलत गुणास पात्र राहणार आहेत. दहावी-बारावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने एकापेक्षा जास्त स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केले असल्यास त्याला खेळाडूची सर्वोच्च कामगिरी असलेल्या एकाच खेळाचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत सादर करावे लागणार आहे. अर्ज सादर करताना शाळेमार्फत त्यांच्या पत्रासोबत अर्ज सादर करावे. तसेच २५ मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहणार आहे. या प्रस्तावासोबत दहावी व बारावीचे परीक्षा प्रवेशपत्र, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेले खेळाचे प्रावीण्य, सहभाग प्रमाणपत्र, क्रीडा सवलत गुण अर्ज विहित नमुना, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावी गुणपत्रकाची प्रत आवश्यक आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..