पुण्यात तापमानात चढ-उतार

पुण्यात तापमानात चढ-उतार

पुणे, ता. ४ ः पुणे शहर आणि परिसरात देखील पुढील आठवडाभर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता असून दुपारनंतर सामान्यतः ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. त्याचबरोबर कमाल व किमान तापमानातील चढ-उतार कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरातील गारठा तुलनेने कमी झाल्याचे जाणवू लागले आहे. पुणे शहरात मंगळवारी २९.४ अंश सेल्सिअस कमाल तर १४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. सरासरीच्या तुलनेत कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली होती. दरम्यान पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती अशीच कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

पावसाची शक्यता
राज्यात थंडीचा कडाका कमी होत पावसासाठी पोषक हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसानंतर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सध्या पश्‍चिमी चक्रावात सक्रिय असून राजस्थान व परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे येत्या ९ जानेवारीपर्यंत वायव्य आणि मध्य भारतात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याचा प्रभाव राज्यावर ही पडणार असून गुरुवारपासून (ता. ६) मध्य महाराष्ट्रात तुरळक तर शनिवारपासून (ता. ८) कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात गारठा कमी होणार आहे.
राज्यात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान ३३.८ रत्नागिरी तर नीचांकी तापमानाची नोंद १२.२ अंश सेल्सिअस गोंदिया येथे झाली. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमान १४ ते २२ अंशापर्यंत नोंदले गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com