
आदिवासी भागात शैक्षणिक सुविधांचा अभाव : वाखारे
पुणे, ता. २४ : ‘‘आजही दुर्गम डोंगराळ आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नाहीत, हे वास्तव आहे,’’ असे पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी अधोरेखित केले.
येडगाव येथील येडेश्वर विद्यालयात ‘टच अ लाइफ’ आणि पारिख फाउंडेशन यांनी संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय अशी सर्व सुविधा युक्त सुसज्ज इमारत निर्माण केले आहे. या वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी वाखारे बोलत होत्या. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, नरेश सुराणा, फाउंडेशनचे जितूभाई पारिख आणि मिलन पारिख, विद्यालयाचे मुख्याध्यापक सीताराम सोनवणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वाघदरे, सचिव अशोक काकडे, मारुती ढोबळे, दीपक घाडगे, सुरेश कसार आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, ‘‘लोकशिक्षणाची चळवळ अजून प्रभावीपणे राबवण्यासाठी दानशूर दात्यांच्या योगदानाची गरज आहे.’’ ‘टच अ लाइफ’ या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३५ शाळांमध्ये इयत्ता नववी आणि दहावीची मोफत पाठ्यपुस्तके दिली जात आहेत आणि अकरा शाळांमध्ये सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि ई-लर्निंग प्रोजेक्टर दिले आहेत, अशी माहिती सुराणा यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपुले यांनी केले. तर दीपक घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..