Home-Generation-Society
Home-Generation-SocietySakal

पुणे : गृहनिर्माण सोसायट्यांचे गणित कोलमडले

गृहनिर्माण सोसायट्यांची देखभाल ही सभासदांच्या मेंटेनन्सवर चालते. परंतु, अपवाद वगळता काही सोसायट्यांमध्ये सभासद मेंटेनन्स वेळेत भरत नाहीत. अशा बेजबाबदार सभासदांमुळे त्या सोसायट्यांचे आर्थिक गणित कोलमडत चालले आहे.
Summary

गृहनिर्माण सोसायट्यांची देखभाल ही सभासदांच्या मेंटेनन्सवर चालते. परंतु, अपवाद वगळता काही सोसायट्यांमध्ये सभासद मेंटेनन्स वेळेत भरत नाहीत. अशा बेजबाबदार सभासदांमुळे त्या सोसायट्यांचे आर्थिक गणित कोलमडत चालले आहे.

पुणे - गृहनिर्माण सोसायट्यांची (Housing Societies) देखभाल ही सभासदांच्या मेंटेनन्सवर (Maintenance) चालते. परंतु, अपवाद वगळता काही सोसायट्यांमध्ये सभासद मेंटेनन्स वेळेत भरत नाहीत. अशा बेजबाबदार सभासदांमुळे त्या सोसायट्यांचे आर्थिक गणित (Economic Calculation) कोलमडत (Collapse) चालले आहे. वीज, पाणी बिल, सुरक्षितता अशा बाबींवर खर्च कसा करायचा, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आता पदाधिकारी थकबाकीदारांवर कायदेशीर चाप लावण्याच्या तयारीत आहेत.

सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आणि अपार्टमेंट त्यांच्या देखभाल खर्चासाठी सर्वसाधारण सभेत ठरल्यानुसार सभासदांना मेंटेनन्स आकारतात. या रकमेतून सोसायटीला दरमहा सार्वजनिक वीजबिल, पाणी बिल, स्वच्छता, टॅंकरवरील खर्च, सुरक्षारक्षक, जलतरण तलाव, उद्यान, एसटीपी प्लॅंट, लिफ्ट दुरुस्ती, जनरेटरसाठी डिझेल, पाइप लिकेज दुरुस्ती अशा कामकाजावर खर्च करावा लागतो. अनेक सोसायट्यांमध्ये सभासद वेळेवर मेन्टेनन्स भरतात. परंतु, काही सोसायट्यांमध्ये सभासद मेंटेनन्स वेळेवर भरत नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बॅंकेतील शिल्लक ठेवी कमी करून खर्च भागविण्याची वेळ येत आहे. सोसायट्यांचे हिशेबाचे गणित कोलमडू नये, यासाठी सभासदांनी मेंटेनन्स वेळेवर भरला पाहिजे, असे मत काही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केले.

मेंटेनन्स न भरल्यास हे दुष्परिणाम

- वीज, पाणी बिल न भरल्यास त्याची कपात

- पाण्यासाठी हालअपेष्टा, सोसायट्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव

- सुरक्षारक्षक नसल्यास सोसायटीची सुरक्षा धोक्यात

- दुरुस्तीची कामे रखडणे

- लिफ्ट नादुरुस्त राहिल्यास सभासदांच्या जीवितास धोका

- सभासदांमध्ये कटुता निर्माण होणे

‘बहुतांश सोसायट्यांमध्ये ९० टक्के सभासद मेंटेनन्स भरतात. परंतु, काही सभासद वीज, पाणी आणि इतर सार्वजनिक सुविधांचा मोफत लाभ घेतात. त्या खर्चाचा बोजा इतर प्रामाणिक सभासदांवर पडतो. त्यामुळे खर्च भागविणे अवघड जाते. त्याचा परिणाम सोसायटीच्या कामकाजावर होतो.’

- संतोष शिंदे, पुणे

‘गृहनिर्माण फेडरेशनच्या कार्यालयात विशेष वसुली अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत थकबाकीदार सभासदांकडील रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांना वसुलीसाठी सहकारी न्यायालयात जाण्याची फारशी गरज पडत नाही.’

- सुहास पटवर्धन, अध्यक्ष- पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशन

‘काही थकबाकीदार बाहेरगावी असतात. जे नोटिशीला जुमानत नाहीत, त्यांच्या मिळकतीवर थकीत रकमेचा बोजा नोंदविला जातो. बॅंक खाते गोठवणे किंवा मासिक वेतनातून थकबाकीची रक्कम वसूल केली जाते. तसेच, प्रसंगी मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाते.’

- संतोष निरगुडे व श्रीकांत पवार, विशेष वसुली अधिकारी

‘एक-दोन अपवाद वगळता सर्व सभासद वेळेवर मेंटेनन्स भरतात. त्यामुळे सोसायटीचे दैनंदिन कामकाज आणि देखभाल चांगल्याप्रकारे करणे शक्य होते.’

- राजश्री भोसले, संचालिका, राजर्षी शाहू सहकारी गृहरचना संस्था, सातारा रस्ता

थकीत मेंटेनन्स वसुलीची प्रक्रिया -

  • थकबाकीदारांना १५ दिवस ते एक महिन्याच्या अंतराने तीन नोटीस बजावून पोच घेणे आवश्यक आहे. तिसऱ्या अंतिम नोटिशीनंतर सोसायटीने स्वत: किंवा वकिलामार्फत सहकार उपनिबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा. निबंधकाकडून सहकार कायद्यातील कलम १०२ (नवीन १५४ ब २९) अन्वये थकबाकीदारांविरुद्ध वसुलीचा दाखला मिळतो. दाखला

  • मिळाल्यानंतर सोसायटीला गृहनिर्माण फेडरेशनकडे वसुली प्रक्रिया शुल्क जमा करावे लागते. ते थकबाकीच्या रकमेच्या सुमारे ४.५० टक्के इतके असते. ते भरल्यानंतर फेडरेशनचे वसुली अधिकारी

  • थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावतात. थकबाकीदाराने मेंटेनन्स न भरल्यास कागदोपत्री ताबा घेतला जातो. मोठ्या थकबाकीदारांच्या प्रकरणांमध्ये निबंधक मालमत्तेची किंमत ठरवून तो अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवितात. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार हे पोलिसांच्या मदतीने मालमत्ता जप्तीची कारवाई करतात.

तुमच्या सोसायटीत काय स्थिती?

अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सभासद मेंटेनन्स वेळेत भरत नाहीत. अशा बेजबाबदार सभासदांमुळे सोसायट्यांचे आर्थिक गणित कोलमडते. तुमच्याही सोसायटीत काय स्थिती आहे, हे आम्हाला आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com