शिवप्रेमींकडून अश्‍वारूढ, सिहांसनारूढ पुतळ्यांना पसंती

शिवप्रेमींकडून अश्‍वारूढ, सिहांसनारूढ पुतळ्यांना पसंती

शुभांगी पाटील ः सकाळ वृत्तसेवा

तुर्भे, ता. १७ : दोन वर्षांपासून असलेले कोरोनाचे सावट काहीसे निवळले असल्‍याने यंदा शिवजयंती जल्‍लोषात साजरी करण्याचे नियोजन सार्वजनिक मंडळांकडून सुरू आहे. शासकीय नियमानुसार, १९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. त्‍यासाठी बाजारात महाराजांचे वेगवेगळे आकर्षक पुतळे दाखल झाले आहेत. शिवभक्‍तांकडून त्‍यांच्या खरेदीला पसंती मिळत आहे.
कोरोना रुग्‍ण संख्या कमी झाल्‍याने प्रशासनाकडून प्रतिबंधात्‍मक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अद्याप मिरवणुका काढण्याबाबत साशंकता आहे. तरी शिवप्रेमींकडून जयंती उत्‍साहात साजरी करण्याबाबत नियोजन सुरू आहे. गेल्‍या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा महाराज्‍यांच्या पुतळ्यांची मागणी वाढल्‍याचे विक्रेत्‍यांकडून सांगण्यात येत आहे.
कोरोना संसर्गामुळे मूर्तिकार व विक्रेत्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले. या वर्षी शिवप्रेमींनी आठवडाभर आधीपासूनच पुतळ्यांची खरेदी सुरू केली आहे. यात अश्वारूढ, सिंहासनारूढ छत्रपती शिवाजीराजे, बाल शिवाजी यांच्या पुतळ्यांना मागणी आहे. पुतळा बनविण्यासाठी किमान सहा महिने आगाऊ नोंदणी केली जात होती. तसेच कांस्‍याच्या पुतळ्याऐवजी फायबरचा पुतळा तयार करण्यास कमी खर्च येत असल्‍याने त्‍याची खरेदी अधिक होत आहे. मूर्तिकारांकडे सध्या अनेक पुतळे तयार आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, रयतेच्या सुखासाठी जीवाचे रान केले. निवडक मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूशी दोन हात केले आणि एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्‍ट्राचे आराध्य दैवत असलेल्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शासकीय, निमशासकीय, राजकीय कार्यालयांत उत्‍सव साजरा केला जातो; तर अनेकांच्या घरांत व कार्यालयात महाराजांचा पुतळा आवर्जून ठेवतात. त्यामुळे शिवजयंतीचे औचित्य साधून महाराजांच्या पुतळ्यांची मागणी वाढली आहे.

कांस्‍याची मूर्ती महाग असल्यामुळे फायबर आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची सध्या मागणी आहे. शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांबाबत सरकारकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्‍यामुळे कोविड नियमांचे पालन करूनच शिवजयंती उत्‍सव साजरा करावा लागणार आहे. तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुतळ्यांच्या विक्रीत वाढ झाल्‍याची माहिती शहरातील एका विक्रेत्‍याने दिली.

पुतळ्यांची किंमत
चार इंची - ९० ते १२० रु.
दोन फूट - १५०० ते २००० रु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com