उन्हाळ्यात पाणीकपात नाही; धरणात पुरेसा पाणीसाठा
उन्हाळ्यात पाणीकपात नाही; धरणात पुरेसा पाणीसाठाsakal

पुणेकरांसाठी खुशखबर!

उन्हाळ्यात पाणीकपात नाही; धरणात पुरेसा पाणीसाठा

पुणे : खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात दीड अब्ज घनफुटांनी (टीएमसी) घट झाली आहे. परंतु, उन्हाळी पिकांसाठी दुसऱ्या आवर्तनामध्ये लागणारे चार टीएमसी पाणी, शहराला दर महिन्याला दीड टीएमसीहून अधिक पाणी, समाविष्ट उपनगरांमधील लोकसंख्या आणि पावसाळा सुरू होण्यास सुमारे तीन महिन्यांचा कालावधी या सर्व बाबी पाहता धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार नाही.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निकषानुसार पुणे महापालिकेला दररोज प्रतिमाणसी दीडशे लिटर पाणी वापरण्याचे निर्देश आहेत. परंतु, महापालिकेकडून जवळपास २७० लिटर पाणीवापर होत आहे. दुसरीकडे शहराची लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून शहरासाठी एक हजार ४६० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) म्हणजेच वार्षिक १८.६२ टीएमसी पाणी घेतले जात आहे. याशिवाय, महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या केशवनगर, शिवणे, कोपरे, कोंढवे धावडे, फुरसुंगी, उरुळी देवाची, वाघोली, मांजरी बुद्रूक, हंडेवाडी आणि शेवाळवाडी या १२ ग्रामपंचायतींना आणि खासगी संस्थांसाठी कालव्याद्वारे दोन टीएमसी, असा सुमारे २० टीएमसीहून अधिक पाणी लागते. त्यानंतर आणखी गावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. परंतु, जलसंपदा विभागाचे नियोजनही त्यादृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे.

दरम्यान, महापालिकेला भामा आसखेड धरणातून २.६७ टीएमसी पाणी आरक्षण मंजूर केले आहे. तेवढाच पाणीसाठा खडकवासला धरणातून कमी करावा, असे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे दरवर्षी हे पाणी दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. परंतु, शहराला अद्याप तेवढे पाणी मिळत नाही.

महापालिकेचा प्रत्यक्ष पाणीवापर
वर्ष...मंजूर पाणीसाठा...वार्षिक प्रत्यक्ष पाणीवापर (टीएमसीमध्ये)
२०१६-१७...११.५०...१६.७१
२०१७-१८...११.५०...१८.७१
२०१८-१९...११.५०...१७.२२
२०१९-२०...११.५०...१८.२४
२०२०-२१...११.५०...१८.६२

पुण्याची लोकसंख्या (१ जुलै २०२० नुसार)
कायमस्वरूपी...५३.१२ लाख
तरती...२.६५ लाख
नवीन समाविष्ट गावे सुमारे...५ लाख

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये...टक्केवारी (११ एप्रिल २०२२ अखेर)
खडकवासला...०.८५...४२.८४
पानशेत...५.६१...५२.७१
वरसगाव...६.१७...४८.१०
टेमघर...०.४८...१२.८४
एकूण यावर्षी...१३.१०...४४.९४
गतवर्षी ११ एप्रिलपर्यंत...१४.७७...५०.६७

‘‘खडकवासला प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात पाणीकपात होणार नाही. परंतु, नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.’’
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com