‘पुणे रेड क्रॉस संस्थे’त जागतिक आरोग्य दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पुणे रेड क्रॉस संस्थे’त 
जागतिक आरोग्य दिन साजरा
‘पुणे रेड क्रॉस संस्थे’त जागतिक आरोग्य दिन साजरा

‘पुणे रेड क्रॉस संस्थे’त जागतिक आरोग्य दिन साजरा

sakal_logo
By

पुणे ः इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या पुणे शाखेतर्फे नुकताच जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त रास्ता पेठ व महात्मा गांधी रस्त्यावरील कार्यालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुणे छावणी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. उषा तापसे, रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. उदय भुजबळ, संस्थेचे उपाध्यक्ष माबिरन नानावटी आदी उपस्थित होते. शिबिरात सर्वप्रथम आलेल्या नागरिक म्हणून गीता तारगे यांनी शिबिराचे उद्‍घाटन केले. यावेळी रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन, ईसीजी, हाडांची ठिसूळता, डोळे व दंत तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच, सहभागी २१९ नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व विशद करून मोफत हायजिन किट देण्यात आले.

पं. फड यांच्या मैफिलीला रसिकांची दाद
पुणे ः ‘संगीतोन्मेष’ संस्थेतर्फे किराणा घराण्याचे गायक पं. यादवराज फड यांची षष्ठ्यब्दीनिमित्त आयोजित पं. फड यांच्या संगीत मैफिलीला रसिकांनी दाद दिली. मैफिलीचा प्रारंभ त्यांनी ‘अब तो बडी बेर’ या भीमपलास रागातील विलंबित एक तालातील ख्यालाने केला. त्यानंतर पं. फड यांनी स्वनिर्मित ‘गहिनीकल्याण’ हा राग सादर केला. ‘अनहत नाद अपरंपार’ ही बंदीश, ‘तुम काहे को नेहा लगाए’ ही ठुमरी, ‘मिराशी गा देवा’ ही रचना आणि ‘अहा रे सावळीया कशी वाजवली मुरली’ व ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ या दोन गवळणींनी मैफिलीची रंगत वाढवली. मैफिलीची सांगता कबीरांच्या ‘बैरन नींद कहा से आयी’ या भैरवीतील रचनेने झाली. पं. फड यांना तबल्यावर अविनाश पाटील, संवादिनीवर संजय गोगटे, मृदंगावर धनंजय वसवे, तालवाद्यावर आनंद टाकळकर तर सुनील पासलकर व राधाकृष्ण गरड यांनी त्यांना स्वरसाथ दिली. सूत्रसंचालन भरत पिंगळे यांनी केले.

पार्किन्सन्स रुग्णांसाठी मोफत कार्यशाळा
पुणेः बीके पारेख पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी, मुंबई यांच्यातर्फे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दर शनिवारी पार्किन्सन्स रुग्णांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेत या आजारासंबंधित वैद्यकीय शोध, फिजिओथेरपी, व्यावसायिक उपचार पद्धती, वाक्-चिकित्सा, आहार आणि पोषण, कला व नृत्यावर आधारित उपचार आदींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. दर शनिवारी सकाळी १०.१५ ते १२.१५ या वेळेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आठव्या मजल्यावर या कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे. या कार्यशाळेत रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक सहभागी होऊ शकतात, अशी माहिती डॉ. वृषाली बेलेकर यांनी दिली.

शुभदा साने यांना पुरस्कार प्रदान
पुणे ः पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा ‘राजेंद्र बनहट्टी कथापुरस्कार’ शुभदा साने यांच्या ‘पूर्ण अपूर्ण’ या कथासंग्रहाला नुकताच प्रदान करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश पळसोदकर यांच्या हस्ते साने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यकारी मंडळाचे सदस्य सुहास नातू यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेच्या कार्यवाह डॉ. सौ. अनुजा कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्रीकांत देव, शरद घाणेकर, सहकार्यवाह विद्युत पावगी, कार्यकारी मंडळाच्या सदस्य ऋचा आठवले आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top