
भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; विचित्र अपघातात मुलगा गंभीर जखमी
धायरी, ता. १६ : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा फटका गुरुवारी (ता. १६) सकाळी एका लहान मुलाला बसला. गल्लीत सायकलवर खेळत असताना कुत्र्यांनी या मुलाचा पाठलाग सुरू केला. स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात सायकलवरून पडल्यानंतर ब्रेक पोटात घुसून तो गंभीर जखमी झाला आहे.
या अल्पवयीन मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो लेन क्रमांक २३ मध्ये सकाळी सायकलवर खेळत होता. त्यावेळी मोकाट कुत्री मागे लागून चावा घेतल्याने सायकलवरुन पडून तो गंभीर जखमी झाला. धायरी परिसरात चार दिवसांपूर्वी याच गल्लीत कुत्र्यांच्या हल्ल्यात वासरूदेखील जखमी झाले आहे.
वडगाव, धायरी, नऱ्हे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्री कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांची टोळकी हल्ला करतात. त्यामुळे नागरिकांना रात्री जीव मुठीत धरुन घरी जावे लागते.
भटक्या कुत्र्यांची काळजी घेणाऱ्यांनी नागरिकांच्या जिवाचीही काळजी घ्यावी. तसेच, अशा घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी भावना जखमी मुलाच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.
‘‘जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका येण्यास विलंब झाला. रुग्णवाहिकेसाठी कॉल केल्यानंतर समोरून बरेच प्रश्न विचारण्यात येत होते. त्यात बराच वेळ गेल्यामुळे मुलाची परिस्थिती गंभीर झाली होती.
- महेश पोकळे, रहिवासी- रायकरनगर, धायरी.