
वडगाव, धायरीतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
धायरी, ता. २० : परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवात जखमी झालेल्या मुलाची प्रकृती सुधारत आहे. कुत्र्यांनी पाठलाग केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात हा मुलगा सायकलवरून पडला होता. सायकलचा ब्रेक त्याच्या पोटात घुसून तो गंभीर जखमी झाला होता. मात्र एवढा गंभीर प्रकार घडूनही क्षेत्रीय कार्यालयाला अद्याप जाग आलेली दिसत नाही. केवळ ७ ते ८ कुत्री पकडण्यापलीकडे कोणत्याही उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत.
वडगाव, धायरी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रात्री-अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांवर कुत्र्यांची टोळकी हल्ला करत आहेत. नऱ्हे भागात असेच चित्र असून, जीव मुठीत धरून रात्री घरी जावे लागते. काही दिवसांपूर्वी वडगावातील धबाडी भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले जखमी झाली आहेत. नऱ्हे भागात कुत्री सोडून देण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्याचाही त्रास लोकांना होत आहे.
भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या श्वानप्रेमींनी नागरिकांच्या जीवाचीही काळजी घ्यावी, असे पीडितांचे म्हणणे आहे. महापालिका प्रशासनही भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवास कारणीभूत आहे, अशीही काही जणांची तक्रार आहे. महापालिकेने यासंबंधी ठोस उपयोजना कराव्या, असे नागरिक महेश पोकळे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
१०८ वर नाराजी
परिसरातील नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी येण्यास उशीर झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. १०८ ला फोन केला असता प्रश्न विचारून वेळ घालवला जातो. त्यामुळे अपघातग्रस्ताची प्रकृती गंभीर होऊन मृत्यूचे कारण ठरवू शकते.