देखणे कुटुंब आपलेपण जपणारे खासदार श्रीनिवास पाटील यांचे गौरवोद्‍गार; पीएच.डी.प्राप्त सदस्यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देखणे कुटुंब आपलेपण जपणारे
खासदार श्रीनिवास पाटील यांचे गौरवोद्‍गार; पीएच.डी.प्राप्त सदस्यांचा सन्मान
देखणे कुटुंब आपलेपण जपणारे खासदार श्रीनिवास पाटील यांचे गौरवोद्‍गार; पीएच.डी.प्राप्त सदस्यांचा सन्मान

देखणे कुटुंब आपलेपण जपणारे खासदार श्रीनिवास पाटील यांचे गौरवोद्‍गार; पीएच.डी.प्राप्त सदस्यांचा सन्मान

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : ‘‘देखणे कुटुंब म्हणजे आपलेपण जपणारी माणसं आहेत. दिवंगत देखणे यांच्या प्रतिमेला शाल घालताना त्यांच्यातील शालीनता, विद्वत्ता, संतसाहित्य, गोंधळ, भारूड डोळ्यांसमोर दिसले,’’ अशा भावना खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केल्या. या वेळी देखणे कुटुंबातील पीएच.डी.प्राप्त दिवंगत देखणे यांच्या प्रतिमेचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या कन्या डॉ. पद्मश्री जोशी, पुत्र डॉ. भावार्थ आणि स्नूषा डॉ. पूजा यांचादेखील सन्मान करण्यात आला.

नवचैतन्य हास्ययोग परिवार आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून संत साहित्य व लोकसाहित्याचे अभ्यासक दिवंगत रामचंद्र देखणे यांच्या कुटुंबातील पीएच.डी.प्राप्त सदस्यांचा सन्मान खासदार पाटील, प्रमोद महाराज जगताप यांच्या हस्ते एस. एम. जोशी सभागृह येथे आयोजित केला होता. या वेळी खासदार पाटील बोलत होते. या प्रसंगी जगताप यांनी दिवंगत देखणे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

‘‘रामचंद्राची वीणा भावार्थाने घेतली, पूजाने सांभाळली. प्रत्येकाच्या डोळ्यात असलेला थेंब आठवणींचा उमाळा आहे. कढ दुःखाचे, सुखाचे असतात. रामचंद्र देखणे देहभान विसरून वासुदेव म्हणून वाळवंटात लोकजागर करीत होते. चैतन्याला नवचैतन्य लागतं, त्याला योग लागतो आणि त्याचा परिवार होतो,’’ असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल काटे तसेच हास्ययोग परिवाराचे सदस्य आदी उपस्थित होते. मकरंद टिल्लू यांनी प्रास्ताविक केले तर प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

...तर आयुष्य सुखकर होईल
वडिलांनी दिलेली दोन हजार व्याख्याने, त्यांची पुस्तके, भारूडे, पायीवारी या माध्यमातून ते आत्मास्वरूपाने जीवंत आहेत. जीवनाचे तत्वज्ञान समजणे महत्त्वाचे आहे. जीवनाची सुंदरता जिथे बघायला मिळेल ते मांडायचे. जीवनात प्रतिकुलतेला अनुकुलतेची जोड द्यावी. लक्ष योग्य ठिकाणी द्यावे, जागृतअवस्थेत माणसाने राहायला हवे. मृत्यू हा अटळ आहे. मी आज शेवटचा दिवस जगतोय हे लक्षात ठेवून जगले तर माणसाचे आयुष्य आणखी सुखकर होईल, असे विचार डॉ. भावार्थ देखणे यांनी जीवनाची सुंदरता या विषयावर बोलताना मांडले.

०८८७२