
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पुलाचे तातडीने सुरू करा’
पुणे, ता. २ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे काम तातडीने हाती घ्यावे. जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहनचालकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत केली.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त विजय मगर, पीएमपीचे अधिकारी, पीएमआरडीएचे अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी, टाटा कंपनीचे अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. बैठकीत विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाचा आढावा घेण्यात आला. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम करणाऱ्या टाटा कंपनी आणि पीएमआरडीएने नोव्हेंबर २०२४ पर्यंत नवीन पूल बांधण्याचे नियोजन केले होते. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी उड्डाण पूल जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी तातडीने या कामातील सर्व अडथळे दूर करण्याची सूचना केली. तसेच मॉडर्न कॉलेज येथील रस्तासुद्धा लवकरात लवकर करावा. विद्यापीठातून भोसलेनगरकडे जाणाऱ्या नवीन पर्यायी मार्गाचे नियोजन करावे, पदपथ कमी करून वाहनांसाठी ज्यादा जागा उपलब्ध करून द्यावी, वाहतूक पोलिसांनी कोंडी टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.