
दिव्यांग मुलांना भक्कम आधार मिळायला हवा ः सुनेत्रा भालवणकर
पुणे, ता. ५ : ‘‘दिव्यांग मुलं जन्माला आली म्हणून पालकांनी हताश न होता, त्या मुलांना पाठबळ दिलं तर ती मुलं उंच झेप घेऊ शकतात. आमच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर सहा महिन्यांनी समजलं तिच्यामध्ये काहीतरी दोष आहे. आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, तुमच्या मुलीला आयुष्यभर आधाराची गरज आहे. नियमित फिजिओथेरपी करावी लागेल, आम्ही मुलीला भक्कम आधार दिला आणि आज ती उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. असं सांगत होत्या, जगातील एकमेव ‘दिव्यांग रोटरॅक्ट क्लब दिव्यझेप’ची अध्यक्ष राहिलेली समृद्धी भालवणकर यांची आई सुनेत्रा भालवणकर.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पूर्व पुणे, ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ दिव्यझेप’चा अध्यक्ष पदग्रहण कार्यक्रम सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे झाला. यावेळी अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांनी समृद्धी भालवणकर व तिची आई सुनेत्रा भालवणकर तसेच ‘यलो’ चित्रपट फेम गौरी गाडगीळ व तिची आई स्नेहा गाडगीळ यांची मुलाखत आयुष्यातील अडथळ्यांना पार करून पुढे जात असल्याबद्दल घेतली. यावेळी स्नेहा गाडगीळ यांनी मुलाखतीत सांगितले,
अनेक ठिकाणी जाण्यासाठी अपंग मुलांना रॅम्प नसतात, अपंग मुलांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतोय. ‘यलो’ हा सिनेमा आल्यानंतर बदल जाणवला. या मुलांकडे शासनाने लक्ष देयला हवं, या मुलांना शासकीय पातळीवर हातभार मिळाला तर मुलं अजून पुढे जातील. मावळती अध्यक्ष समृद्धी भालवणकर हिने नवीन अध्यक्ष गौरी देशमुख हिच्याकडे ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ दिव्यझेप’च्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष रोटरी क्लबच्या अध्यक्षा योगिता वैशंपायन या होत्या. प्रमुख पाहुणे ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस हे होते. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. सुनील गायकवाड, दत्तप्रसाद जोशी, प्रा. योगिता काळे, चित्रा देशपांडे, हितेन शहा, शेखर गाडगीळ, पल्लवी गाडगीळ आदी उपस्थित होते.
भाषा माझं आवडतं क्षेत्र आहे, शब्दांशी खेळायला आवडतं. संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करू इच्छिते, त्यासाठी जर्मन भाषा देखील शिकते आहे. लेखनिक (रायटर) ज्वलंत समस्या आहे. ऐनवेळी रायटर मिळत नाहीत. रायटर फोरम स्थापन करायचा आहे. यासाठी रोटरीचे पाठबळ मिळायला हवे.
- समृद्धी भालवणकर माजी अध्यक्ष रोटरॅक्ट क्लब दिव्यझेप
पाण्यात उडी मारायची भीती वाटत होती, मात्र प्रशिक्षकांनी गोष्ट सांगून प्रोत्साहन दिले. प्रशिक्षक कल्याणी काने, जितेंद्र खासणीस, सौरभ देशपांडे, ऋषीकेश तातूसकर यांच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकले. मी वाळवलेल्या पालेभाज्या विक्रीचा व्यवसाय देखील करते. यासाठी नागरिकांची मदत मिळावी तर अजून दिव्यांग मुलांना घेऊन काम करता येईल.
- गौरी गाडगीळ, यलो चित्रपट फेम
Id: PNE22T09464