
भीमथडी जत्रा २१ डिसेंबरपासून
पुणे, ता.१५: दरवर्षी प्रमाणे यंदा भीमथडी जत्रेचे आयोजन २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत करण्यात आल्याची माहिती सुनंदा पवार व कुंती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशनच व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने भीमथडी जत्रा कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर (सिंचननगर) पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी नावीन्यपूर्ण आकर्षण घेऊन येणारी भीमथडी जत्रा भरडधान्याचे (मिलेट-नाचणी, राळ, सावा, भगर, सामा, वरई) वेगळे दालन करत असून याशिवाय वैविध्यपूर्ण वस्तूंसह, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू, अशी वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना घेऊन येत आहे.
यंदाची भीमथडी जत्रा १६ व्या वर्षात पदार्पण करत असून महाराष्ट्राची कलासंस्कृती, ग्रामीण खाद्य महोत्सव यासह महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणची, कपडे, फळे पालेभाज्या, धान्य, कडधान्य आदी उत्पादने विक्रीस उपलब्ध असतील. हायड्रोपोनिक्स शेती, मातीविना शेती, विषमुक्त पालेभाज्या, गायीचा गोठा, कुकुटपालन, शेळीपालन, किचन गार्डन, मत्स्यव्यवसाय, पुष्परचना, रेशीम व मधुमक्षिका असे माहितीचे वैविध्यपूर्ण स्टॉल जत्रेत असतील.