
‘गृहनिर्माण सोसायटी पुनर्विकासासाठी सुवर्णकाळ’
पुणे, ता. २५ : सोसायट्यांचा पुनर्विकास करायचा असेल तर सध्याची वेळ म्हणजे सुवर्णकाळ आहे. पुनर्विकास लांबणीवर गेला तर नुकसानही होऊ शकते, असे मत बांधकाम व संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
‘सकाळ रिडेव्हपलपमेंट फोरम’ व ‘रावेतकर ग्रुप’च्या संयुक्त विद्यमाने ‘पुनर्विकास - नवे वर्ष - नवे पर्व’ परिसंवादाचे आयोजन शुक्रवारी (ता. २४) पंडित फॉर्म, डीपी रोड, कर्वेनगर येथे करण्यात आले होते. या वेळी बांधकाम व संबंधित क्षेत्रातील अभ्यासकांनी सोसायट्यांचा पुनर्विकास, सध्याची परिस्थिती, तांत्रिक व कायदेशीर अडचणी, प्रशासकीय नियमावली यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सोसायटी पदाधिकारी, प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल तर संबंधित रहिवाशांनी एकत्र येऊन वास्तुविशारद नेमायला हवा, बांधकाम व्यावसायिक ही जबाबदारी पेलू शकेल का? हे सोसायटी पदाधिकारी व सभासदांनी तपासायला हवे. कोरोनाकाळात नागरिकांना स्वत:च्या घराचे महत्त्व समजले. त्यामुळे नागरिक स्वप्नपूर्तीसाठी उत्तम, प्रशस्त घर खरेदी करू लागले. शासनाने नियमावलीमध्ये बदल केल्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांना त्याचा फायदा होत आहे. पुनर्विकास झालेल्या जवळपास ९९% सोसायटीची पुनर्विकास प्रक्रिया यशस्वीपणे झाली. त्यामुळे पदाधिकारी, सभासदांनी सोसायटी पुनर्विकासात विनाकारण अडचणी आणणाऱ्या १% टक्के सभासदांकडे लक्ष न देता सकारात्मक दृष्टीने ९९% यशस्वी झालेल्या सोसायटीकडे पाहायला हवे.
स्पर्धेत पुनर्विकास सल्लागारांकडून सोसायट्यांची दिशाभूल तर होत नाही ना? हे तपासणे महत्त्वाचे आहे. एफएसआय कागदावर नसून प्रत्यक्ष देणे शक्य आहे का? बांधकाम गुणवत्ता दुर्लक्षित होऊ नये, याकडे लक्ष द्यायला हवे. बांधकाम साहित्याची दरवाढ लक्षात घेता फ्लॅटचे दर वाढत जातील, त्यामुळे सोसायट्यांचा पुनर्विकास व नवीन फ्लॅट खरेदीसाठी सध्याची परिस्थिती उत्तम असल्याचे, मत या वेळी उपस्थित अभ्यासकांनी व्यक्त केले.
रावेतकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर, ए अँड टी कन्सलटंटचे वास्तुविशारद विकास अचलकर व मनोज तातुसकर, कायदेतज्ज्ञ अॕड. नितीन साबळे व अॕड. संदीप सोहनी यांनी सोसायटी पदाधिकारी व सभासदांना या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी मुलाखतवजा प्रश्नांमधून तज्ज्ञांकडून सोसायटी पुनर्विकासाविषयीची माहिती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. तर नरेंद्र जोशी यांनी आभार मानले.
पुनर्विकासासाठी सुवर्णकाळ आलेला असून प्रशासनाकडून बांधकाम व्यावसायिकांना सहकार्य मिळते आहे. पुनर्विकास जास्त लांबवाल तर नुकसान होईल. योग्य बांधकाम व्यावसायिकाची निवड करीत सोसायटींनी पुनर्विकास लवकर करायला हवा.
- अमोल रावेतकर, व्यवस्थापकीय संचालक, रावेतकर ग्रुप
युडीसीपीआर व टीओडी धोरणांद्वारे राज्याने बदल केले आहेत. चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे एफएसआय, इमारतीची उंची, सुविधांसंबंधाने फायदा सोसायटीधारकांना होत आहे. गरज आहे ती सोसायटींनी पुनर्विकासासाठी एकमताने पुढे येण्याची.
- विकास अचलकर, वास्तुविशारद
पुर्वी पाचशे फूटाचा फ्लॅट पुरेसा होता, आता २ हजार फूटाचा फ्लॅट गरजेचा वाटतो. सध्या इतरांना मिळत असलेल्या सुविधा आपल्यालाही मिळाव्यात असे वाटत आहे. शासन पातळीवरही पुनर्विकास क्षेत्राला स्वतंत्र नियमावली करण्यात आली. नव्या संकल्पना त्यामध्ये आल्या आहेत.
- मनोज तातुसकर,वास्तुविशारद
सोसायटीच्या सभासदांनी बांधकाम व्यावसायिकाकडे बॅंक गॅरंटीसाठी आग्रह धरू नये. याला पर्याय म्हणून, यापेक्षा तेवढ्या किमतीचे फ्लॅट सोसायटीकडे गहाण ठेवण्याच्या पर्यायावर विचार करता येऊ शकतो. सिमेंट, वीट, वाळू , खडी बॅंककर्ज सध्या कशाचीही कमतरता नाही. ज्या सोसायटी लवकर पुनर्विकास करतील त्यांना चांगल्या सुविधा मिळतील.
- सुहास पटवर्धन
सोसायटीचे सभासद एकत्र असतील तर लवकर पुनर्विकास होतो. वकील मंडळींनी फक्त कायदेशीर सल्ला न देता योग्य त्या पद्धतीने सोसायटी पदाधिकारी व सभासदांना परिस्थिती व व्यावहारिकता समजून सांगावी.
- नितीन साबळे, कायदेतज्ज्ञ
कर्वेनगर : परिसंवादात उपस्थितांना मार्गदर्शन करताना (डावीकडून) अमोल रावेतकर, सुहास पटवर्धन, मनोज तातुसकर, विकास अचलकर, अॕड. नितीन साबळे, अॕड. संदीप सोहनी, राजेश दामले.
फोटो
शहाजी जाधव