कै. प्रकाश नारायण बहिरट उद्यान

कै. प्रकाश नारायण बहिरट उद्यान

(माहिती संकलन ः समाधान काटे, नितीन बिबवे, विठ्ठल तांबे, मोहिनी मोहिते, कैलास गावडे, कृष्णकांत कोबल, अशोक गव्हाणे, बंडू दातीर, अभिजित कुचेकर, नीलेश कांकरिया, रीना महामुनी, नीलेश बोरुडे, दीपक शिंदे.


प्रकाश नारायण बहिरट उद्यान, गोखलेनगर
- लहान मुलांची खेळणी व व्यायामाचे साहित्य तुटलेले आहे.
- स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता केली जात नाही. कोंडाळे बसवले, तिथे अस्वच्छता असते.
- जॉगिंग ट्रॅकवर पालापाचोळा पडलेला असतो.
- उद्यानातून नाला जातो; मात्र तो स्वच्छ केला जात नाही. डासांचे प्रमाण वाढले आहे.
..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, अप्पर-बिबवेवाडी
- उद्यानात लहान मुलांची खेळणी आहेत; परंतु तेथील दगड, मातीमुळे मुलांना खेळण्याचा आनंद घेता येत नाही. मुले पडून जखमी होतात.
- पिण्याच्या पाण्याची टाकी बंदावस्थेत आहे. त्यामुळे बागेत फिरायला येणाऱ्यांना पाणी मिळत नाही.
- स्वच्छतागृहाचे पाइप तुटलेले असल्याने ते बंद आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा.
- सकाळी-सायंकाळी सुरक्षारक्षक असतात, रात्रीच्या वेळी नसल्यामुळे मद्यपींचा अड्डा होतो.

छत्रपती संभाजी महाराज उद्यान, अप्पर-बिबवेवाडी
- उद्यानात कामाचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे.
- उद्यानात स्वच्छतागृह नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय
- मुलांची काही खेळणी नादुरुस्त आहे.
- सुरक्षारक्षक राहत असल्यामुळे रात्रीच्या वेळी वेळेत उद्यान बंद होते.

दुर्गामाता उद्यान, सुपर-बिबवेवाडी
- उद्यानाला कचराकुंडीचे स्वरूप आलेले आहे.
- लहान मुलांच्या खेळण्यात कचरा, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत.
- पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही.
- स्वच्छतागृह नाही, सुरक्षारक्षक खोलीचा वापर स्वच्छतागृह म्हणून. त्यामुळे परिसरात दुर्गंधी.
- सुरक्षारक्षक नाहीत, त्यामुळे उद्यान मद्यपींचा अड्डा

- केशवराव देशपांडे उद्यान, इंदिरानगर
- लहान मुलांची खेळणी सुस्थितीत आहेत; परंतु पिण्यासाठी पाणी नाही.
- पाण्याच्या टाकीशेजारी कचरा टाकला जातो.
- एकच स्वच्छतागृह असल्यामुळे महिलांची कुचंबणा
- पोलिस ठाणे शेजारीअसूनसुद्धा उद्यानात मद्यपी मद्यपान करतात.

उद्यानात मुलांना घेऊन फिरायला गेलो तर पिण्यासाठी ना पाणी, ना स्वच्छतागृह. खेळणी तुटलेली केवळ नावाला उद्याने आहेत. सगळीकडे केवळ विकासकामांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे.
- श्रीरंग खुळे, रहिवासी, अप्पर
....
गोखलेनगरमधील श्री संत गजानन महाराज उद्यानातील स्वच्छतागृहाची स्वच्छता केली जात नाही. पालापाचोळा पडलेला असतो. फांद्या वेळेवर कापल्या जात नाहीत.
या भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते.
- प्रदीप ढोरजे, रहिवासी, गोखलेनगर
.....
मोहनराव भिडे उद्यान, अभिरुची मॉल, वडगाव
- उद्यानाचे क्षेत्र भव्य असूनही अर्धवट विकास.
- अनेक ठिकाणी राडाराडा, झाडीझुडपे वाढलेली
- ट्रॅकवर गवत आलेले असल्याने गैरसोय
- वॉकिंग ट्रॅकही अर्धवट असून येथे येणाऱ्या नागरिकांना अर्धवट कामाचा त्रास

- शांताबाई एकनाथ चरवड उद्यान, वडगाव बुद्रुक
- उद्यानाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात फळभाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण
- स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा
- लहान मुलांसाठीदेखील गैरसोय

नारायण रायकर उद्यान, धायरी
- एक हजार चौरस फूट जागेत उद्यान बांधण्याचा ‘विक्रम’ धायरीतच पहायला मिळतो.
- या उद्यानाकडे जाणारा रस्ता कमालीचा चढ-उताराचा असल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास
- मोजक्या लोकांसाठी असलेले हे उद्यान बहुसंख्य जनतेसाठी असून नसल्यासारखे आहे.
- लेन नं. ए २० आणि २१ दरम्यान उद्यानासाठी विस्तृत क्षेत्रफळावर आरक्षण आहे.
- संबंधित भूखंड कोणत्याही विकासकामाविना पडून आहे.
- नऱ्हे गावात एकही उद्यान नाही. येथे जागा आरक्षित आहे की नाही असा नागरिकांना प्रश्न

उद्यानात स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. लहान मुले व महिलांची गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्याचीदेखील सोया नाही. उद्यानातील ट्रॅकवर कचऱ्याचे ढीग आठ दिवसांपासून पडून आहे.
- चंदन कड, नागरिक, वडगाव बुद्रुक
.....

श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान, घोरपडे पेठ
- स्वच्छतागृहात लाइटची व्यवस्था नाही.
- कमी दाबाने पाणी असते.
- उद्यानात असणाऱ्या निळे फुले जलतरण तलावात वीज व्यवस्था नाही.

डॉ. श्यामराव कलमाडी उद्यान, बापूसाहेब पाटोळे, घोरपडे पेठ
- कलमाडी सुरक्षारक्षक व देखरेख करणारे कोणी नाही.
- साठलेला पालापाचोळा नियमित उचलला जात नाही.
- स्वच्छ्तागृहाची सोय नाही.
- पाटोळे उद्यानात मुलांसाठी खेळण्याचे साहित्य नाही.
- स्वच्छ्तागृहात पाणी नसल्याने ते बंद ठेवण्यात आले आहे.
- ओपन जिमचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे.
- व्यायाम शाळा साहित्याअभावी गेल्या अनेक वर्षांपासून बंद

श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यानात दहावी, बारावी तसेच स्पर्धा परीक्षार्थी अभ्यासासाठी येत असतात. काही ठिकाणी वीज, तर काही ठिकाणी अंधार अशी स्थिती आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री अंधाराचा फायदा घेत मद्यपी, नशा करणाऱ्यांचा वावर असतो. गेल्या पाच वर्षांत संपूर्ण प्रभागात सव्वाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होऊनही उद्यान अद्यावत झालेले नाही.
- सुजाता शेलार, महिला अध्यक्षा आलवसा फाउंडेशन

कै. बापूसाहेब पाटोळे उद्यानाची उजाड अवस्था झालेली आहे. नागरिकांकडून सकाळी फेरफटका मारण्यापर्यंतच या उद्यानाचा वापर होतो. बाकी काहीही सुविधा येथे उपलब्ध नाही. उद्यान अद्यावत व्हावे अशी आमची मागणी आहे.
-संदीप पाटोळे, रहिवासी
.....
राणी लक्ष्मीबाई, जे. जे. उद्यान, एमजी रस्ता
- स्वच्छतागृह, वीज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
- लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे.
- पाण्याचे फाउंटन पाण्याअभावी बंद
- विजेची व्यवस्था नसल्याने सायंकाळी अंधार
- उद्यानाबाहेर हातगाड्यांचे अतिक्रमण, त्यांच्याकडे मात्र विजेची व्यवस्था
- अंधाराचा फायदा घेत मद्यपींचा अड्डा भरतो
....
पिण्यासाठी व स्वच्छतागृहातदेखील पाण्याची व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबणा होते. अस्वच्छता असल्याने उद्यान परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. व्यायामासाठी असलेले साहित्य तसेच लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य पूर्णपणे तुटलेले आहे. बाहेरील स्टॉलधारक उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच भांडी धुवत असल्याने खरकटे, पाणी उद्यानात येते. नियमित स्वच्छता होत नसल्याने स्वतः आम्ही ज्येष्ठ नागरिक मिळून स्वच्छता करत असतो.
- उषा केंचनगुड, अध्यक्षा, नवचैतन्य हास्ययोग परिवार
......
मुंढव्याची ७० वर्षांपासून उपेक्षा
मुंढवा, केशवनगर परिसरात महापालिकेने एकही उद्यान उभारलेले नाही. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची उद्यानांअभावी उपेक्षा होत आहे. मुंढवा महापालिकेत १९५२ मध्ये समाविष्ट करण्यात आले. या घटनेला सत्तर वर्षे उलटली. या कालावधीत मुंढव्याने नगरसेवक, महापौर, उपमहापौर पदे उपभोगली; परंतु महापालिका येथे एकही उद्यान उभारू शकलेली नाही. केशवनगर हे गेल्या सहा वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट करण्यात आले. मात्र पालिकेने उद्यानासाठी पाऊल उचलले नाही. केशवनगरमध्ये पालिकेची नव्वद एकर गायरान जमीन आहे. त्यावर उद्यान उभारावे, अशी मागणी होत आहे.
.....

कै. विठ्ठलराव तुपे पाटील उद्यान, सातववाडी
- सात वर्षे उलटूनही अद्याप अपूर्णावस्थेत
- यापूर्वी बसवलेली खेळणी नादुरुस्त
- कारंजे, बैठक व्यवस्था, दिवाबत्ती नादुरुस्त
- उद्यान असूनही झाडांची वानवा

हे उद्यान सुरू होण्याची आम्ही गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहत आहोत. मात्र कामात सातत्य नसल्याने दुसरे काम होईपर्यंत पहिल्याची दुरवस्था झालेली दिसते. सध्या सुरू असलेल्या कामाला गती नाही. उद्यानात आताच चांगले वृक्षारोपण होणे आवश्यक आहे.
तुषार क्षीरसागर, रहिवासी
....
शहीद हेमंत करकरे उद्यान, सातववाडी
- उद्यानातील पिण्याच्या पाण्याची नादुरुस्त
- स्वच्छतागृह पाण्याविना अस्वच्छ, आतमध्ये सांडपाण्याचा साठा
- बसवलेली काही खेळणी नादुरुस्त झाली आहेत
- मुलांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
- उद्यानात बसवलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृती तुटून पडल्या आहेत.
- बैठक व्यवस्था, दिवाबत्ती नादुरुस्त
- पदपथ व वॉकिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे.

उद्यानाच्या चारही बाजूंना मोठ्या प्रमाणात नागरीकरण आहे. आम्ही अनेक जण नित्यनेमाने येथे येतो. अनेक कुटुंबे सकाळ-सायंकाळी येथे येत असतात. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. उद्यानाची तातडीने देखभाल होण्याची गरज आहे.
- राजेंद्र पवार, नीलेश अमृतकर, तुकाराम कांबळे, उमेश चिंचोलकर
.....
डॉ. राममनोहर लोहिया उद्यान, मगरपट्टा चौक
- पट खराब झाला आहे.
- स्वच्छतागृहात पुरेसे पाणी नाही.
- कारंजे नादुरुस्त आहे.
- प्रवेशद्वारावर फिरत्या व्यावसायिकांच्या वाहनांचा त्रास
....

राजमाता उद्यान कात्रज-नवले पुल रस्ता
- उद्यान मद्यपींचा अड्डा होत असून, त्यावर आळा घालण्याची गरज आहे.
- पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था नाही.
- लहान मुलांची खेळणी व साफसफाई यांच्या देखभालीकडेही दुर्लक्ष

नानासाहेब पेशवे उद्यान, कात्रज
- दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात त्रास; तलावाच्या साफसफाईकडे प्रशासनाचे सर्सास दुर्लक्ष
- किसनराव माउली कदम उद्यानात मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडल्याचे चित्र असते.
- तेथील साफसफाईकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- कोंढवा परिसरातील उद्यानांमध्ये काही ठिकाणे शौचालये नसून, ती बांधण्याचे काम सुरू आहे. नाना-नानी उद्यानाचा फलक मात्र व्यवस्थित दिसून येत नसून, त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडतो

कात्रज परिसरातील उद्यानांची स्थिती चांगली आहे. मात्र काही नियम पाळले जात नसल्याचे दिसून येते. सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ अशी उद्यानांची वेळ आहे. परंतु दुपारच्या बंद सत्रातही काही जण उद्यानात बसत असल्याचे दिसून येते.
- अजित यादव, रहिवासी
....
एलएमडी उद्यान, बावधन
- उद्यानातील कचरा वेळोवेळी उचलला जात नाही. त्यामुळे उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचा ढिग लागलेला असतो.
- मुलांसाठी स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही.
- स्वच्छतागृहाबाहेर अस्वच्छता पसरली आहे.

मराठा मंदिर ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत वसलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत हे एलएमडी उद्यान खूपच छोटे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलांना पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सुविधा होणे गरजेचे आहे. महापालिकेच्या या भागातील इतर अॅमेनिटी स्पेसमध्ये उद्यान होण्याची आवश्यकता आहे.
- महादेव लोखंडे, अक्षय सुमंत, नागरिक

पद्मश्री ग. दी. माडगूळकर उद्यान, बावधन
- महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय आहे.
- लहान मुलांच्या खेळण्यांसाठी मात्र पुरेशा प्रमाणात खेळणी नाहीत.

ज्येष्ठ नागरिक मंडळींना शारीरिक आणि मानसिक शांततेसाठी हे उद्यान खूप चांगले आहे. उद्यानाची स्वच्छता आणि टापटिपपणा नियमित ठेवला जातो. मुलांच्या खेळण्यासाठी मात्र अधिकची खेळणी असणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे या उद्यानाविषयी बऱ्याचशा नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे महत्त्वाच्या चौकात उद्यानाबाबत स्थाननिर्देशाच्या सूचना लावणे गरजेचे आहे.
- अनिलकुमार मुळीक, ज्येष्ठ नागरिक

वन उद्यान, बावधन
- बावधन-पाषाण रस्त्याच्याकडेला पूर्वेकडे डोंगर उताराला हे उद्यान उभारण्यात आले आहे.
- येथील मुलांच्या खेळण्याच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. काही साहित्य जीर्ण झाले आहे.
- खेळणी ठेवलेली जागा सपाट करणे गरजेचे आहे.
- स्वच्छतागृहही बंदावस्थेत असून पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.

एप्रिल मे महिन्यात मुलांना सुट्या लागतात. बावधनकरांसाठी वन उद्यान जवळ आहे. परंतु येथे मुलांचे साहित्य खूप कमी आहे. जे आहे त्याची मोडतोड झाली आहे. खेळण्याच्या साहित्याची दुरुस्ती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे मुलांच्या खेळण्याची जागाही सपाट करण्याची आवश्यकता आहे. मुलांना पिण्याच्या पाण्याचीही सुविधा होणे गरजेचे आहे.
- गणेश कामत
.....
खेळण्यासाठी १५ किलोमीटर जावे लागतंय
एकही उद्यान नसल्याने फुरसुंगी, उरुळी देवाची, उंड्री, पिसोळी या गावांतील नागरिकांकडून उद्यानाची मागणी जोर धरत आहे. नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सुविधांचा जणू काही दुष्काळ जाणवत आहे. उंड्री,पिसोळी ही गावे चार वर्षांपूर्वी पालिकेत समाविष्ट करण्यात आली. मात्र या भागात पालिकेला अद्याप एकही उद्यान करता आलेले नाही. या गावातील नागरिकांना उद्यानासाठी सात किलोमीटर हडपसर नाही तर पंधरा किलोमीटर स्वारगेट या ठिकाणी जावे लागते. दोन्ही ठिकाणे जाणे म्हणजे पूर्ण एक दिवस खर्ची तर पडतोच; मात्र येथे कुटुंबासोबत जाणे म्हणजे बसवर नाहीतर खासगी वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे उद्यानांची मागणी जोर धरत आहे.

मिळकत करात पालिका करमणुकीचाही कर आकारत आहे. मात्र तशी सुविधा देत नाही. मुलांची परीक्षा संपली आणि सुटी चालू झाली की मुलं बागेत खेळायला जाण्याचा हट्ट करतात; मात्र गावातच नाही तर आजूबाजूच्याही गावात एकही उद्यान नाही. सायंकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना व्यायामासाठी हाकेच्या अंतरावर उद्यान उपलब्ध करणे आवश्यक आहे.
- विठ्ठल होले, नागरिक, उंड्री

या भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास पालिकेने केला तर लक्षात येईल की येथे डोंगर आणि वनविभागाच्या जागा आरक्षित आहेत. जंगली प्राण्यांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे कात्रजसारखे मोठे प्राणिसंग्रहालाय उभे करणे सहज शक्य आहे.
- युवराज धनवडे, नागरिक, वडाचीवाडी
.....
वाघेश्वर उद्यान, वाघोली
- मुलांची खेळणी तुटलेल्या स्थितीत.
- अनेक दिवे बंद स्थितीत, यामुळे काही भागात अंधार.
- स्वच्छतागृहाचे बांधकाम अपूर्ण स्थितीत. त्यामुळे सोय नाही.
- गवतावर पाणी फवारण्याची वाहिनी तुटलेली
- काही ठिकाणी सीमाभिंत तुटलेली. यामुळे चोरीच्या घटना
- ओपन जिममधील साहित्य तुटलेले
- यातील एका साहित्याची व पाइपची चोरी
- काही ठिकाणी झुडपांची वाढ
- पिण्याच्या पाण्याची सोय नाही
- पुणे महापालिका अर्थसंकल्पात वाघेश्वर उद्यानासाठी २५ लाख रुपयांची तरतूद

प्रभू श्री रामचंद्र उद्यान, वाघोली
- मुलांसाठी असलेली खेळणी तुटलेल्या स्थितीत.
- स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण. त्यामुळे सोय नाही.
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
- विजेचा अभाव.
- सीमाभिंतीची जाळी तुटलेली.
- दोन सुरक्षारक्षकांची गरज.
- उद्यानाची निगा राखण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती गरजेची.

ग्रामपंचायत असताना उद्यानांची उभारणी केली. त्या वेळी व्यवस्थित निगा राखली जायची. महापालिकेत समावेश झाल्यापासून उद्यानांची दुरावस्था झाली आहे. वाघोलीत एकमेव मोठे उद्यान असल्याने ते सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून मुले व नागरिक त्याचा आनंद लुटू शकतील.
- राजेंद्र सातव, वाघोली

प्रभू श्री रामचंद्र उद्यानात खेळणी तुटलेली असून, स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. तसेच सुरक्षा जाळी तुटलेली असून, तिची दुरुस्ती व सुरक्षारक्षकांची नेमणूक गरजेची आहे. हे झाल्यास उद्यानाचा आनंद लुटता येईल.
- संदीप सातव, वाघोली
.....
धनकवडीचा प्रकल्प प्रतीक्षेत
धनकवडीत उद्यान नसल्यामुळे मुलांना खेळायला सहकारनगर भागात जावे लागते. धनकवडीतील चैतन्यनगर भागातील नियोजित उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ज्या जागेवर उद्यानाचे आरक्षण आहे, ती खासगी जागा असल्यामुळे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या उद्यानाबाबतचे निर्णय नगर विकास खात्याकडे प्रलंबित आहेत. हे उद्यान होण्यासाठी स्थानिक माजी नगरसेवक विशाल तांबे गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहेत. धनकवडीतील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून उद्यानाच्या प्रतीक्षेत आहेत.
....
खडकवासला, किरकटवाडी भागाकडे दुर्लक्ष
खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर व नांदेड या गावांसाठी सद्यःस्थितीत पालिकेचे एकही उद्यान अथवा खेळाचे मैदान नाही. खडकवासला येथे तत्कालीन ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाच्या जागेत उद्यान विकसित केले होते; परंतु तेथील खेळाच्या साहित्याची मोडतोड झालेली आहे. किरकटवाडी येथे श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने मालकीच्या जागेत उद्यान विकसित केलेले असून, तेथेही तत्कालीन ग्रामपंचायतीने लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी व ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाक बसविलेले आहेत. नांदोशी, सणसनगर व नांदेड येथे मात्र सद्यःस्थितीत एकही उद्यान अथवा खेळाचे मैदान नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करून केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या (सीडब्ल्यूपीआरएस) जागेत सुसज्ज उद्यान व खेळाचे मैदान उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे.

लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने उद्याने व खेळाच्या मैदानांची अत्यंत आवश्यकता आहे. गावातील मोठ्या प्रमाणात क्षेत्र केंद्र शासनाने अधिग्रहित केलेली आहे; मात्र त्या सर्व जागेचा आजतागायत पूर्णपणे वापर झालेला नाही. तेथे उद्यान, मैदान व इतर लोकोपयोगी प्रकल्प होऊ शकतात.
- नरेंद्र हगवणे, नागरिक, किरकटवाडी

रस्ते अरुंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना बाहेर फिरणे अवघड होत आहे. तसेच मुलांनाही रस्त्यावर खेळावे लागत आहे. त्यामुळे या भागात सुसज्ज उद्यान व खेळाचे मैदान असणे अत्यंत आवश्यक आहे.
- रमेश करंजावणे, नागरिक, किरकटवाडी
.....
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यान, रामटेकडी
- अनेक वर्षांपासून संथ गतीने कामे सुरू
- लहान मुलांसाठीच्या खेळण्यांची वेळोवेळी अज्ञाताकडून मोडतोड
- नागरिकांना पिण्याचे पाणीच मिळत नाही.
- स्वच्छतागृह अर्धवट स्थितीत आहे.
- अनेक विद्युत खांबांची झाकणे उघडी असल्याने लहान मुलांना धोका

पुणे महापालिकेची किती तरी उद्याने आहेत की जी या उद्यानाच्या नंतर अतिशय सुंदर करण्यात आली आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर या उद्यानातील कामे पूर्ण करावीत.
- दादा साठे, नागरिक, रामटेकडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com