
विद्यापीठ चौकातील कोंडीचा प्रश्न सोडविणार : शिरोळे
पुणे, ता. १३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील नियोजित मेट्रो उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी तेथे वाहनचालकांसाठी सध्याच्या मार्गासोबत पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्दीनुसार वाहतूक नियोजनावर भर देण्याचे ठरले.
विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल व परिसरातील वाहतूक विषयक विविध समस्या सोडविण्याकरिता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयामध्ये सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. उड्डाणपुलाचे काम १५ ऑगस्ट २०२४पर्यंत पूर्ण करून तो सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.
उड्डाणपुलाचे काम करताना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची यावेळी चर्चा झाली. नागरिकांनी केलेल्या विविध सूचना विचारात घेण्यात आल्या.
पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, विवेक खरवडकर, शहर वाहतूक पोलिस उपआयुक्त विजयकुमार मगर, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, टाटा कंपनीचे प्रकल्प संचालक अक्षय शर्मा यावेळी उपस्थित होते.
नियोजित पर्यायी मार्गाची पाहणी
चौकात बाणेरच्या बाजूला सध्या सुरू असलेल्या खांबांचे काम लवकर केल्यास औंधच्या बाजूला पुलाचा रॅम्प बांधण्यास परवानगी देण्याचे वाहतूक पोलिसांनी मान्य केले. त्यामुळे १५ ऑक्टोबरनंतर ते काम सुरू होईल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्ता रुंदीकरण जलद गतीने करण्याचे मान्य केले. विद्यापीठाच्या आवारातून रेंजहिल्सकडे जाण्यासाठी दुचाकी वाहनांना स्वतंत्र मार्ग देण्याचा निर्णय घेण्यात आला.