
मुख्यमंत्र्यांनी घेतले खंडोबाचे दर्शन भंडारा उधळून केला कुलधर्म कुलाचार
जेजुरी, ता. २ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (ता. २) जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते. पूजा करीत त्यांनी खंडोबाचे दर्शन घेतले तसेच भंडारा उधळून कुलधर्म कुलाचारही केला. पदावर असताना खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे पहिले मुख्यमंत्री अशी चर्चा या वेळी गडावर रंगली.
सायंकाळी सहा वाजता शिंदे गडावर दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासमवेत खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप लांडे, आमदार तानाजी सावंत, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.
या प्रसंगी मार्तंड देवसंस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्य विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, ॲड. अशोक संकपाळ, पंकज निकुडे-पाटील, प्रसाद शिंदे, व्यवस्थापक राजेंद्र देशमुख उपस्थित होते.
सासवड येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री जेजुरीतील शिवाजी चौकात आल्यानंतर येथे नव्याने बनविण्यात आलेल्या कडेपठार मंदिराच्या शिखराच्या कळसाचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गुरव कोळी वीर घडशी समाज संघटनेच्यावतीने मंदिरातील पूजा सुरू कराव्यात यासाठी मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष जयदीप बारभाई यांनी दिले. तर आरपीआयचे अध्यक्ष पंढरीनाथ जाधव यांनी संविधानाची प्रत त्यांना भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी कलशपूजन केल्यानंतर कलशाची गावात मिरवणूक काढण्यात आली.
पदावर असताना दर्शनासाठी येणारे पहिले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री पदावर असताना खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरले आहेत. यापूर्वी मंत्री व माजी मुख्यमंत्री आल्याची नोंद आढळते. त्यामुळे त्यांच्या खंडोबा दर्शनाची चांगलीच चर्चा रंगली. जेजुरीचा विकास आराखडा लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास देवसंस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Web Title: Todays Latest Marathi News Jej22b00654 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..