
राजकीय स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करू नये : पवार
खळद, ता. ९ : ‘‘राज्यात सरकार चालवत असताना जातीय सलोखा ठेवणे गरजेचे असून कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. अशा वेळी कोणीही आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करू नये,’’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली.
खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि फियाट इंडिया कंपनीच्या सीएसआर निधीतून इयत्ता सहावी ते बारावीच्या मुलींसाठी निवासी इंग्रजी माध्यमाच्या ज्योती-सावित्री इंटरनॅशनल स्कूलचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, ‘फियाट’चे उपाध्यक्ष राकेश बावेजा, राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘भोंग्याची परंपराही गेले अनेक वर्षांपासून चालू आहे. मात्र, सध्या काहींच्या चुकीच्या विधानांमुळे पंढरपूर, शिर्डी येथील आरत्या बंद पडल्या, तसेच गावोगावच्या काकड आरत्याही बंद झाल्या आहेत. शाहू, फुले व आंबेडकर यांचे विचार घेऊन आपण पुढे चालत आहे. हनुमान चालिसा म्हणण्याला आमचा विरोध नाही. परंतु, दुसऱ्याच्या घरी जाऊन ते म्हणणे चुकीचे असून दुसऱ्या समाजाला त्रास देणे याच्यातून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर लोकांनी त्यांना साथ देऊ नये आणि भडकावू वक्तव्यांना बळी पडू नये.’’
खानवडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी ज्या मागण्या केल्या आहेत. या मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार व ग्रामस्थ यांनी संयुक्त बैठक घेऊन निर्णय घ्यावा. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पवार यांनी या वेळी दिले.
फळे ,भाजीपाला याबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्येही पुरंदरची वेगळी ओळख शिक्षणाबरोबरच पुरंदरचा पर्यटन क्षेत्र विकास केला जाईल व नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पुरंदरची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
जगताप म्हणाले, ‘‘पुरंदर तालुक्यातील खानवडी मध्ये शैक्षणिक संकुल होत असल्याचा अभिमान असल्याचे सांगत या बरोबरच स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या भूमीमध्ये उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध कराव्यात यासाठी आवश्यक असणारे जागेची तरतूद स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून केली जाईल.’’ प्रास्ताविक आयुष प्रसाद यांनी केले. ऋषिकेश हुली यांनी प्रकल्प सादरीकरण केले. सरपंच स्वप्नाली होले यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kaa22b01001 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..