विद्यार्थी-पालकांचा शाळेवर बहिष्कार अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थांना नोटिसा दिल्याचे पडसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी-पालकांचा शाळेवर बहिष्कार 
अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थांना नोटिसा दिल्याचे पडसाद
विद्यार्थी-पालकांचा शाळेवर बहिष्कार अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थांना नोटिसा दिल्याचे पडसाद

विद्यार्थी-पालकांचा शाळेवर बहिष्कार अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थांना नोटिसा दिल्याचे पडसाद

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. १६ ः अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थांना प्रशासनाने नोटिसा दिल्या तसेच शाळा बंद करण्याचा डाव पुणे जिल्हा परिषदेकडून सुरू असल्याचा आरोप करीत वाबळेवाडीतील सर्वच पालकांनी आपली पाल्ये यापुढे शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद जोपर्यंत आमच्या शाळेवरील हक्क आणि नियंत्रण सोडत नाही, तोपर्यंत शाळेत मुले पाठवली जाणार नाहीत. याबाबतचा तत्काळ निर्णय न घेतल्यास साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्धार बैठकीत झाला.
पुणे जिल्हा परिषदेने शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांची चौकशी व निलंबन करून शाळेचे संपूर्ण कामकाजच विस्कळित केले. शाळेत सुरू असलेले संगीत, कला, क्रीडा, रोबोटिक्स, प्रोग्रॅम कोडींग, फाउंडेशन, विविध भाषाज्ञान, साहित्य संस्कार हे उपक्रम बंद झाल्याने पहिल्या टप्प्यात सुमारे २०२ विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. याच काळात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना जबाबदार धरीत, ग्रामस्थांनी त्यांनी शाळेत यावे, असे आवाहन केले. मात्र, ते आले नाहीत. आता अंगणवाडी सेविका, उर्वरित शिक्षक व ग्रामस्थांचीच चौकशी नव्याने सुरू केल्याने आता पालकांचा संयम सुटला आहे. यापुढे वाबळेवाडी शाळेत विद्यार्थी पाठवायचेच नाहीत, असा निर्णय शुक्रवारी (ता. १४) सुमारे सव्वा तीनशे पालकांच्या उपस्थितीत पालकसभा अध्यक्षा भारती वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. पर्यायाने अंगणवाडी व शाळेतील सध्या शिकत असलेले ४७५ विद्यार्थी यांनी शनिवारपासून (ता. १५) शाळेत जाणे बंद केले आहे. यापुढील कार्यवाहीचे सर्व अधिकार पालकांनी पालक सभा अध्यक्षा भारती वाबळे, रेशमा वाबळे, योगिता वाबळे, शैला वाबळे, धनश्री पलांडे, अश्विनी भोसले, सुरेखा दौंडकर, सुमित्रा अरगडे, दीपाली कदम, मोहिनी मांढरे, पूनम विरोळे-पाटील व रूपाली सुर्वे आदी ११ महिलांना देण्याचे ठरले.


चौकट
विद्यार्थी शाळेत न पाठविण्याची कारणे
- अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ८ महत्त्वाचे उपक्रम बंद
- पूर्णवेळ मुख्याध्यापकच नाही
- दत्तात्रेय वारे यांची चौकशी अजूनही अपूर्णच
- सीईओ शिरूर तालुक्यात येतात पण शाळेत एकदाही फिरकत नाही
- शाळा बंद करण्याचा डाव दिसत असल्याचा ग्रामस्थांना संशय
- उर्वरित शिक्षक व ग्रामस्थांनाही चौकशीच्या नोटिसा
- सीईओंच्या प्रतिनिधी वंदना शिंदेही महिनाभरापासून गायब