
भागवत धर्म प्रसारक पुरस्कार शंकर टेमघरे यांना जाहीर
मुक्ताईनगर, ता. ३ : कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे दिला जाणारा ‘भागवत धर्म प्रसारक’ पुरस्कार पुणे येथील दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक शंकर टेमघरे यांना जाहीर झाला. श्री क्षेत्र कोथळी येथे या पुरस्काराची घोषणा संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केली. येथून संत मुक्ताबाईंच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे शुक्रवारी (ता. ३) प्रस्थान झाले. या वेळी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या प्रसंगी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे आणि विश्वस्त उपस्थित होते.
या संदर्भात माहिती देताना ॲड. पाटील यांनी सांगितले, की श्री संत मुक्ताबाई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी संप्रदायातील एका पत्रकाराला २०१९ पासून ‘भागवत धर्म प्रसारक’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. २०१९ चा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांना देण्यात आला होता. त्यानंतर कोरोनामुळे सलग दोन वर्षे या पुरस्काराचे वितरण करता आले नव्हते. हा पुरस्कार आषाढी एकादशीच्या दिवशी रविवारी, १० जुलैला दुपारी दोन वाजता पंढरपूर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानच्या मठात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
टेमघरे हे १९९५ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत आहेत. साप्ताहिक शिवतेज, अलंकापुरी, दैनिक लोकसत्ता, देशदूत, ऐक्य, पुढारी या दैनिकांमध्ये त्यांनी काम केले असून, सध्या ते पुण्यात ‘सकाळ’मध्ये कार्यरत आहेत. त्यांचा संत साहित्याचा गाढा अभ्यास आहे. १९९६ पासून ते वारीचे वार्तांकन करीत असून, ‘सकाळ’सह साम टीव्हीवरील वारी विशेष मालिकेची संकल्पना, संशोधन व लेखन ते करीत आहेत. त्यांनी श्री संत नामदेव महाराजांच्या जीवनावर आधारित ‘प्रेमभंडारी’ आणि ‘ज्ञानभंडारा’ या पुस्तकांचे लेखन केले आहे.
०११६२
Web Title: Todays Latest Marathi News Mkt22b00781 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..