गुजरातची विजयी हॅट्‌ट्रिक, मुंबईला नमवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरातची विजयी हॅट्‌ट्रिक, मुंबईला नमवले
गुजरातची विजयी हॅट्‌ट्रिक, मुंबईला नमवले

गुजरातची विजयी हॅट्‌ट्रिक, मुंबईला नमवले

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः गुजरात जायंट्स संघाने अल्टिमेट खो-खो स्पर्धेत बुधवारी सलग तिसऱ्या विजयाला गवसणी घातली. गुजरातने मुंबई खिलाडीज संघावर ६६-४८ अशा फरकाने विजय मिळवत ९ गुणांसह तालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. मुंबईला त्यांच्याविरुद्ध दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अन्य लढतीत चेन्नई क्विक गन्स संघाने तेलुगू योद्धाज संघाला ५२-४६ अशा फरकाने पराभूत केले. चेन्नईचा हा पहिला विजय ठरला. योद्धाजला स्पर्धेतील पहिल्याच पराभवाला सामोरे जावे लागले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील गुजरात-मुंबईतील सामन्यात रंजन शेट्टीने कर्णधाराला साजेसा खेळ करताना आक्रमणात सहा गुणांची नोंद केली व गुजरातसाठी मोलाची कामगिरी बजावली. विनायक पोकर्डे आणि नीलेश पाटील यांनी अनुक्रमे ८ आणि ७ गुणांची कमाई करताना त्याला उत्कृष्ट साथ दिली. मुंबई संघाकडून दुर्वेश साळुंखे याने आक्रमणात ११ गुणांची नोंद करताना केलेली झुंज एकाकी ठरली. त्याआधी गुजरातने पॉवरप्लेमधून सुरुवात करताना अक्षय भांगारे, अभिनंदन पाटील यांचे वझिरात रूपांतर केले. हा निर्णय कमालीचा फायदेशीर ठरला. त्यांनी कर्णधार विजय हजारे, रोहन कोरे आणि विसाग एस. ही मुंबईची पहिली तुकडी २ मिनिटे ७ सेकंदात तंबूत परतवून एकूण १० बचावपटू टिपताना आपल्या संघाला २५-०० अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या बाजूला मुंबईनेसुद्धा पॉवरप्लेमधून बचावाला प्रारंभ करताना गुजरातची पहिली तुकडी १ मिनीट ३० सेकंदात तंबूत परतवली. साळुंखेने या तुकडीतील अखेरचा खेळाडू खांबावरून सूर मारत बाद केला. साळुंखेने चार बचावपटू टिपताना मुंबईकडून एकूण ११ गुणांची कमाई केली. पहिल्या डावाअखेर दोन संघांमध्ये २७-२७ अशी बरोबरी झाली होती. गरगटेने दोन बोनस गुणांसह २ मिनिटे ३० सेकंद संरक्षण करताना गुजरातकडून कडवी झुंज दिली.
गुजरातने दुसऱ्या डावात वेगवान आक्रमण करताना एकूण ३७ गुणांची कमाई केली. त्यानंतर मुंबई सर्वोत्तम कामगिरी करूनही त्यांना अखेरच्या सात मिनिटांत केवळ २१ गुण मिळवता आले. त्यामुळे गुजरातला मुंबईवर सलग दुसऱ्या विजयाची नोंद करता आली. गुजरातचा संघ अद्याप अपराजित आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93458 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..