मुंबईत आजपासून इलेक्ट्रिक दुमजली बस सेवा

मुंबईत आजपासून इलेक्ट्रिक दुमजली बस सेवा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईकर प्रवाशांचे लक्ष लागून राहिलेली इलेक्ट्रिक डबल डेकर (दुमजली) बस सोमवारपासून (ता. १३) सेवेत दाखल होत आहे. बेस्टच्या कुलाबा आगारात या डबल डेकर बस सेवेला सुरवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बस बेस्टच्या ताफ्यात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दाखल झाल्या होत्या. बेस्टच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा समावेश होणार आहे. 
लंडन शहरामधील डबल डेकर बससारखाच या वाहनांचा लुक आहे. डबल डेकर बसला दोन जिने असून बसमध्ये चढणे आणि उतरणे प्रवाशांसाठी सोईचे होणार आहे. बसला मोठमोठ्या पारदर्शक काचा असल्याने मुंबईचे दर्शन करणे सोपे होणार आहे. यात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. युरोपमधील इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या धर्तीवर या अत्याधुनिक बस असल्याने मुंबईकरांना या वाहनांतून प्रवासाची उत्सुकता लागून राहिली आहे.
नवीन डबल डेकर बस दक्षिण मुंबईतील काही मार्गांवरून धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर या बस धावणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या तीन मार्गांवर बस धावणार असली, तरी टप्प्याटप्प्याने मार्गांमध्ये वाढ केली जाणार आहे. या बसचे किमान अंतरासाठी (म्हणजेच पाच किलोमीटर) भाडे हे सहा रुपये असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com