बंगळूर संघाचे आव्हान कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंगळूर संघाचे आव्हान कायम
बंगळूर संघाचे आव्हान कायम

बंगळूर संघाचे आव्हान कायम

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १५ ः रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने महिला प्रीमियर लीगमधील पहिला विजय अखेर बुधवारी मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने यूपी वॉरिअर्सवर पाच विकेट राखून मात केली आणि या स्पर्धेतील आव्हान कायम राखले. यूपी वॉरिअर्सला मात्र तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एलिस पेरीची (३/१६) प्रभावी गोलंदाजी व कनिका अहूजा (४६ धावा) हिची जबरदस्त फलंदाजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली.
यूपी वॉरिअर्सकडून बंगळूरसमोर १३६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. सोफी डिव्हाईन (१४ धावा), स्मृती मानधना (०) व एलिस पेरी (१० धावा) यांच्याकडून निराशा झाली. यामुळे बंगळूरला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागेल अशी चिन्ह निर्माण झाली. हेथर नाईटने २४ धावांची खेळी करीत थोडीफार झुंज दिली. पण कनिका अहुजा व रिचा घोष या जोडीने बंगळूरसाठी सामना फिरवला. कनिका हिने ३० चेंडूंमध्ये ४६ धावांची खेळी केली. रिचाने ३२ चेंडूमध्ये नाबाद ३१ धावा केल्या.
दरम्यान, याआधी बंगळूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यूपी वॉरिअर्सच्या फलंदाजांना अव्वल दर्जाची कामगिरी करता आली नाही. एलिसा हिली (१ धाव), देविका वैद्य (०), किरण नवगिरे (२२ धावा) व ताहलिया मॅग्रा (२ धावा) या पहिल्या चार क्रमांकावरील फलंदाजांना अपयश आले. ग्रेस हॅरीसने ३२ चेंडूंमध्ये ५ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांची खेळी साकारली व डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दीप्ती शर्माने १९ चेंडूंमध्ये २२ धावा करीत यूपी वॉरिअर्सच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. बंगळूरच्या एलिस पेरी हिने सर्वाधिक ३ फलंदाज बाद केले. सोफी डिव्हाईन व एस. आशा यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. यूपी वॉरिअर्सचा डाव १९.३ षटकांत १३५ धावांवरच आटोपला.

संक्षिप्त धावफलक ः यूपी वॉरिअर्स १९.३ षटकांत सर्व बाद १३५ धावा (किरण नवगिरे २२, ग्रेस हॅरिस ४६, दीप्ती शर्मा २२, एलिस पेरी ३/१६, सोफी डिव्हाईन २/२३, एस. आशा २/२७) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १८ षटकांत ५ बाद १३६ धावा (हेथर नाईट २४, कनिका अहुजा ४६, रिचा घोष नाबाद ३१, दीप्ती शर्मा २/२६).