सूर्यकुमार यादवची फटकेबाजी : कोहलीनेही लुटला गोलंदाजीचा आनंद दुसऱ्या विजयासह भारत ‘सुपर फोर’ फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूर्यकुमार यादवची फटकेबाजी : कोहलीनेही लुटला गोलंदाजीचा आनंद
दुसऱ्या विजयासह भारत ‘सुपर फोर’ फेरीत
सूर्यकुमार यादवची फटकेबाजी : कोहलीनेही लुटला गोलंदाजीचा आनंद दुसऱ्या विजयासह भारत ‘सुपर फोर’ फेरीत

सूर्यकुमार यादवची फटकेबाजी : कोहलीनेही लुटला गोलंदाजीचा आनंद दुसऱ्या विजयासह भारत ‘सुपर फोर’ फेरीत

sakal_logo
By

दुबई, ता. ३१ : पाकिस्तानविरुद्ध सलामी सामन्यात शेवटच्या षटकात विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाने तुलनेने दुबळ्या असलेल्या हाँगकाँग संघाविरुद्ध ४० धावांनी विजय मिळविला आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत प्रवेश केला. विजय होणार हे स्पष्ट झाल्यावर विराट कोहलीनेही गोलंदाजीचा आनंद लुटला. शुक्रवारी पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होणार असून, त्यात पाकचा विजय अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यामुळे चार तारखेला पुन्हा भारत-पाकिस्तान सामना अपेक्षित आहे.

सूर्यकुमार यादव व विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकच्या जोरावर भारताने १९२ धावा केल्यावर हाँगकाँगला १५२ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यापूर्वी नाणेफेक जिंकून हाँगकाँग संघाचा कर्णधार निझाकत खानने गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला मोठे फटके मारणे प्रमुख भारतीय फलंदाजांना सोपे गेले नाही. मात्र, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली ही जोडी जमल्यावर धावांचा वेग वाढला. सूर्यकुमार यादवने नाबाद ६८ धावांची
तोडफोड खेळी करून विराटसह ७ षटकात ९८ धावांची अविभाजित भागीदारी केल्याने २० षटकांत भारतीय संघाने २ बाद १९२ अशी मजल मारली. विराटने बऱ्याच कालखंडानंतर नाबाद ५९ धावांची दमदार खेळी केली. भारतीय संघाने एक बदल करत जायबंदी असलेल्या हार्दिक पंड्याच्या जागी रिषभ पंतला संधी दिली. पहिली फलंदाजी करायची भारतीय संघाची इच्छा नाणेफेक गमावूनही पूर्ण झाली. हाँगकाँगच्या कमी वेगाच्या गोलंदाजांना खेळणे सोपे नव्हते. के. एल. राहुलला जम बसवायला वेळ लागला. समोरून रोहित शर्माने धोका पत्करून मोठे फटके मारायचा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नात रोहित बाद झाला. के. एल. राहुलने ३६ धावा करून विकेट गमावली.

पहिल्या सामन्याप्रमाणे नजर बसल्यावर विकेट देण्याची चूक विराटने टाळली. शेवटच्या सात षटकांत धावगती वाढवण्याची गरज होती. म्हणून सूर्यकुमार यादवने खेळपट्टीवर पाऊल ठेवल्यापासून एकदम आक्रमक पवित्रा घेतला. खेळलेल्या प्रत्येक चेंडूला तडाखा देत सूर्यकुमारने धावफलक हलता ठेवला. अर्धशतक पूर्ण करायला कोहलीला ४० चेंडू लागले त्याचवेळी सूर्यकुमारने तीच मजल फक्त २२ चेंडूंत सहा चौकार चार षटकारांसह गाठली. शेवटच्या षटकात सूर्यकुमारने ४ षटकारांसह २६ धाव चोपून काढल्या. सूर्यकुमार ६८ धावांवर तर कोहली ५९ धावांवर नाबाद परतले.

फलंदाजी करताना हाँगकाँग संघाच्या मनात २० षटके तग धरायचा पहिला विचार होता. बाबर हयातने जोरकस फटके मारून ‘हम भी कुछ कम नहीं’ असा जणू संदेश दिला. कर्णधार नियाकत खानला जडेजाने अफलातून धावबाद केल्याने लढत मंदावली. जडेजानेच बाबर हयातला बाद केले. ३० धावा करणाऱ्या किंचित शहासह मधल्या फळीतील फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी बऱ्यापैकी थोपवून धरले. २० षटकात हाँगकाँग संघाला खूप मेहनत करूनही ५ बाद १५२ धावा जमा करता आल्या आणि भारताने सामना ४० धावांनी जिंकला.

संक्षिप्त धावफलक ः भारत २० षटकांत २ बाद १९२ (के. एल. राहुल ३९, ३६ चेंडू, २ षटकार, रोहित शर्मा २१, १३ चेंडू, २ चौकार, १ षटकार, विराट कोहली नाबाद ५९, ४४ चेंडू, १ चौकार, ३ षटकार, सूर्यकुमार यादव नाबाद ६८, २६ चेंडू, ६ चौकार, ६ षटकार, आयुष शुक्ला १-२९, महम्मद गनझाफर १-१९). विजयी विरुद्ध हाँगकाँग २० षटकांत ५ बाद १५२ (निझाकत खान १०, बाबर हयात ४१, ३५ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, किंचित शहा ३०, अयाझ खान १४, झिशान अली नाबाद २६, स्कॉट मॅकेन्झी नाबाद १६, रवींद्र जडेजा १-१५, आवेश खान १-५३, भुवनेश्वर कुमार १-१५, अर्शदीप सिंग १-४४).

Web Title: Todays Latest Marathi News Ngp22h65575 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..