ठाकरे मार्ग जेव्हा गोखले मार्ग बनतो....

ठाकरे मार्ग जेव्हा गोखले मार्ग बनतो....

कोथरूड, ता. २३ ः कोथरूडमधील संगीतकार श्रीकांत ठाकरे पथ गुगल मॅपवरुन गायब होऊन त्याजागी गोखले मार्ग दिसू लागला आहे. गुगलस्नेही कोथरुडकरांना त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. ‘ठाकरे मार्ग गोखले मार्ग बनला कसा’ याची विचारणा करणारे निवेदन महापालिका आयुक्त व पोलिसांना देऊन कोथरुडकरांनी या घटनेचा निषेध केला आहे.

महापालिकेत २००८ मध्ये ठराव पास होऊन संगीतकार श्रीकांत ठाकरे पथाचे नामकरण झाले. कुमार परिसर, महेश विद्यालय, गांधीभवन व महात्मा सोसायटीकडे जाणारा हा रस्ता स्वच्छ, सुस्थितीतला व निवांतपणे फिरणाऱ्यांचा आवडता आहे.

शहरात जी-२० परिषदेचे आयोजन केल्यावर काही रस्त्यांचे सुशोभीकरण खासगी मदतीतून करण्यात आले. डीपी रस्त्याला जोडलेल्या श्रीकांत ठाकरे पथाला अशाच रीतीने सजविण्यात आले. अगोदरच चांगला असलेल्या या रस्त्यावर दोन पथदिवे व सुशोभित पानांचे शिल्प लावले म्हणजे रस्ता खासगी मालकीचा झाला का? त्यामुळे रस्त्याचे नाव बदलले का, असा प्रश्न माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांनी विचारला. गोरडे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त व कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

गोरडे म्हणाले की, नाव समितीमध्ये रीतसर प्रस्ताव मान्य होऊन पुणे महापालिकेने या रस्त्याचे नामकरण संगीतकार श्रीकांत ठाकरे पथ असे केले. सर्वांना अंधारात ठेवून परस्पर नाव बदलण्यात आणण्याची ही कृती, महापालिका, जनता व ठाकरेंचाही अपमान करणारी आहे. पुणे महापालिकेला ‘ठाकरे’ या नावाचे वावडे आले आहे का? बंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
--------------------------
महापालिकेने या रस्त्याचे नाव बदललेले नाही. बदलण्याचे कारणही नाही. गुगल मॅपवर जर असे काही झाले असेल, तर त्याची चौकशी करण्यात येईल. महापालिकेचे आयटी डिपार्टमेंट याबद्दल जास्त व्यवस्थित सांगू शकेल. - केदार वझे, सहायक आयुक्त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय
------------------------
गुगल मॅपमध्ये ‘ठाकरे पथ’ आता ‘गोखले मार्ग’ बनला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com