
ओपन जिममध्ये विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
कोथरूड,ता. २० : उजव्या भुसारी कॉलनीतील ओपन जीमवर व्यायाम करताना विजेच्या धक्क्याने अमोल शंकर नाकते, (वय २२, रा. भूगाव) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २०) संध्याकाळी आठच्या सुमारास घडली. त्याच्यामागे आई व भाऊ असा परिवार आहे.
अमोल हा इव्हेंट मॅनेजमेंटची कामे करायचा. तो दररोज संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या मैदानात मित्रांसोबत व्यायाम करायला यायचा. सोमवारी तो व्यायाम करतेवळी अचानक खाली पडल्याचे पाहून मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याच्या पायातून विजेचा प्रवाह वाहिल्याने पायाच्या बोटांना दुखापत झाली होती. त्याला जवळच्या हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेल्प रायडर प्रशांत कनोजिया म्हणाले, ‘‘ओपन जीमच्या या साहित्याखालून विजेच्या वाहिन्या जात आहेत. त्याची योग्य तपासणी करावी.’’
अग्निशमन दलाचे गजानन पाथ्रुडकर म्हणाले, ‘‘खुल्या मैदानात जॉगिंग ट्रॅक व ओपन जीम आहे. येथे वीजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू झाला. हा वीज प्रवाह कोणता, याची अधिक तपासणी करणे गरजेचे आहे.’’ याबाबत कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील तपास करत आहेत.