पाच वर्षे मला बोलू दिले नाही ः महाजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच वर्षे मला बोलू दिले नाही ः महाजन
पाच वर्षे मला बोलू दिले नाही ः महाजन

पाच वर्षे मला बोलू दिले नाही ः महाजन

sakal_logo
By

कोथरूड, ता. २९ : ‘‘गेली पाच वर्षे मला कोणी बोलू दिले नाही. पण, समोरच्याचे बोलणेही न चिडता ऐकून घेणे हा माझ्यासाठी एक अनुभव होता. समोरच्या व्यक्तीचे शांतपणे ऐकून घेणे मला महाराष्ट्राने शिकवले’’, असे मत लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र चित्पावन संघाच्या वतीने परशुराम जयंतीचे औचित्य साधत ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि निवेदक सुधीर गाडगीळ यांचा महाजन यांच्या हस्ते श्री परशुराम पुरस्काराने गौरव करण्यात आला. ११ हजार रुपये रोख, गौरवपत्र, श्री परशुरामाची मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी महाजन बोलत होत्या.
महाराष्ट्र चित्पावन संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, कार्याध्यक्ष अजय दाते, कार्यवाह सुप्रिया दामले व रोहित खरे, माजी कार्याध्यक्ष अशोक वझे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. दामले आणि ओक यांनी पुरस्काराची रक्कम परशुराम भवन येथे उभारण्यात येणाऱ्या विद्यार्थी वसतिगृहाला देणगी स्वरूपात दिली.  
महाजन म्हणाल्या, ‘‘आजचे सर्व पुरस्कार्थी हे त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात अभ्यास करून, कष्ट करून स्वः कर्तृत्वावर मोठे झाले आहेत. आज त्यांचा सत्कार करताना मला अभिमान वाटतो आहे. आपली मुलं इतकी मोठी झाली याचा अत्यानंद होत आहे.’’
गाडगीळ म्हणाले, ‘‘बोलण्याचे कुठे पैसे मिळत असतात का? असा प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगतो की, गेली ५० वर्षे मला पैसेच उत्तर देत आहेत. याशिवाय आजचा पुरस्कारही मिळाला. मी या क्षेत्रात माझ्या पत्नीमुळेच आलो.’’
ओक म्हणाले, ‘‘आज नाटक आणि इतर व्यासपीठांवर काम करताना भाषा, आवाजाला महत्त्व आहे. आई-वडिलांनी मला या गोष्टी शिकविल्या. त्यांच्यामुळेच माझी भाषा सुधारली.’’
सुप्रिया दामले यांनी सूत्रसंचालन केले. रोहित खरे यांनी प्रास्ताविक केले तर अजय दाते यांनी आभार मानले.


पुण्यातील नाट्यगृह माझ्यासाठी माहेरच
‘‘तुला तुझी लायकी सिद्ध करायची असेल तर, पुण्यात नाव कमवायला लागेल, असे मला माझा मित्र लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाला होता. त्याचा प्रत्यय ‘टुरटुर’ या नाटकादरम्यान आला. मुंबईत हे नाटक चालत नव्हतं; मात्र पुण्याने ते उचललं. या नाटकाची इतकी चांगली आणि वेगवान ‘माऊथ पब्लिसिटी’ झाली की, पुढे ते मुंबईत उसळलं. आज बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह हे जणू माझ्यासाठी माहेरच आहेत,’’ अशी भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.