एसटी बसची दहा गाड्यांना मागून धडक; एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बसची दहा गाड्यांना मागून धडक; एक ठार
एसटी बसची दहा गाड्यांना मागून धडक; एक ठार

एसटी बसची दहा गाड्यांना मागून धडक; एक ठार

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव एसटी बसने दोन मोटारी, सात दुचाकी, एक रिक्षा अशा एकूण दहा गाड्यांना धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर सहा ते सात जण जखमी झाले आहेत. सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाण पुलावर गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गाडी थांबविण्यासाठी चालकाने उड्डाण पुलाच्या कठड्यांना बस धडकवली. मात्र तिचे संतुलन आणखीनच बिघडले.
ब्रेक निकामी होऊन एसटीचा अपघात झाल्याचा दावा चालकाने केला आहे; मात्र तसे काहीही झाले नसल्याचे एसटीच्या यांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चालकाने हँडब्रेक लावला असता तर अपघात टळला असता, असा निष्कर्षही या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाच्या पाहणीनंतर काढला. अपघातात दुचाकीस्वार संजय माणिकराव कुरलेकर (वय ५३, रा. कमांड हॉस्पिटलमागे, वानवडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सूरज चंद्रकांत देवगिरीकर (वय २६, रा. आंबेगाव बुद्रुक) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी बसचालक संतोष जनार्दन हेंद्रे (रा. पारगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) याला अटक केली आहे.
सातारा-स्वारगेट ही विनाथांबा बस (क्रमांक एमएच ०६ एस ८४६७) सातारा येथून सकाळी साडेआठ वाजता पुण्याकडे जाण्यास निघाली. अकराच्या सुमारास ही बस धनकवडी येथील सद्‍गुरू शंकर महाराज उड्डाण पुलावरून स्वारगेटच्या दिशेने जाताना पूल जिथे संपतो, तेथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पुणे विभागाचे प्रभारी विभाग नियंत्रक अशोक सोंड, विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रनवरे इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांसह हजर झाले. त्यांनी बसची पाहणी केली.


४३ प्रवासी बालंबाल बचावले
एसटी चालकाने गाडी थांबविण्यासाठी उड्डाण पुलाच्या कठड्यांना धडका दिली. मात्र त्या वेळी जर कठडा तुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. गाडीत ४३ प्रवासी होते. उड्डाण पुलावरून जर एसटी कोसळली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र सुदैवाने तसे काही झाले नाही. या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.


सिग्नलला थांबलेल्या वाहनांना धडक
स्वारगेटच्या दिशेने उड्डाण पुलाच्या उताराला चव्हाणनगर कमानीजवळ चौकात लाल सिग्नल लागला होता. या चौकात वाहनाची संख्या कायम जास्त असते. त्यामुळे वाहनांची रांग उड्डाण पुलाच्या उतारापर्यंत होती. त्याच वेळी भरधाव बसने सिग्नलला थांबलेल्या मागच्या वाहनांना धडक दिली.

आता पुढे काय?
अपघातग्रस्त एसटी गुरुवारी सायंकाळी स्वारगेट बसस्थानकात आणण्यात आली. त्यानंतर अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एसटी प्रशासनाने ‘आरटीओ’ला पाचारण केले. त्यानुसार ‘आरटीओ’चे मोटार वाहन निरीक्षक गाडीची पाहणी करून खरेच ब्रेक निकामी झाला होता का? याची तपासणी करून अहवाल देतील, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अपघातग्रस्त एसटी बसची पाहणी केली असता ब्रेक निकामी झाल्याचे प्रथमदर्शनी वाटत नाही. ‘आरटीओ’च्या तपासणीत सत्य समजेल. चालकाने केलेला दावा जरी गृहीत धरला तरीही हँड ब्रेकचा वापर केला असता तर निश्चितच अपघात टाळता आला असता.
- अशोक सोंड, प्रभारी विभाग नियंत्रक, एसटी विभाग, पुणे

धनकवडी, पुणे : सद्‍गुरू श्री शंकर महाराज उड्डाण पुलावर अपघात झालेली एसटी बस व नुकसान झालेली वाहने.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12731 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top