
चोरी परवडली, पण तपास नको!
‘‘आपल्या घरी चोरी झाली आहे, ही बातमी या कानाची त्या कानाला कळता कामा नये. माहेरीच काय पण शेजाऱ्यांनाही कळायला नको.’’ वंदनाला मी सक्त ताकीद देऊन कामावर गेलो. सायंकाळी सोसायटीत आल्यावर सुरक्षारक्षक म्हणाला,‘‘साहेब, हे असं कसं झालं? मी तर रात्रभर जागाच होतो. तुमच्या घरी चोरी होतेच कशी?’’ सुरक्षारक्षकाने मलाच जाब विचारला.
थोडं पुढं आल्यानंतर नेवसेकाका म्हणाले, ‘‘याला राज्य सरकारच जबाबदार आहे. चोऱ्या होतातच कशा? याचा अर्थ राज्यात बेरोजगारी व गुन्हेगारी वाढत चालली आहे.’’
घरी आल्यानंतर पाहिलं तर हिच्या माहेरची सात-आठ माणसं व शेजारपाजारची काही मंडळी चहा-नाश्त्यावर तुटून पडली होती. मी बळंबळं त्यांच्यातून वाट काढून बेडरुममध्ये गेलो. मी कपडे बदलत असतानाच वंदनाचे दूरचे काका कार्लेकर आत घुसले व म्हणाले, ‘‘अहो, आता कपडे कशाला बदलताय? पहिलं पोलिस ठाण्यावर जाऊन तक्रार दाखल करू. चला पटकन.’’
पोलिस ठाण्याचं नाव काढताच माझे हात-पाय लटलट कापायला लागले. घशाला कोरड पडली. मी कार्लेकरांचे पाय धरले. ‘‘हे पाच हजार रुपये तुम्ही घ्या पण पोलिसांचं नाव काढू नका.’’ मी आवंढा गिळत म्हटले. ‘‘अहो, मग चोराला पकडणार कोण? मुद्देमाल सापडणार कसा?’’ कार्लेकरांनी विचारलं. मग मी दीर्घ पॉझ घेतला व वर्षाभरापूर्वीची घरफोडीची कहाणी त्यांना सांगू लागलो. त्यावेळी मी तिरमिरीत एक चुकीची गोष्ट केली, ती म्हणजे पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर मात्र चक्रव्यूहात अडकत गेलो.
‘‘अशी कशी झाली चोरी? त्यावेळी तुम्ही काय करत होतात?’’ या फौजदारसाहेबांच्या सरबत्तीपुढे मी घाबरलो. ‘‘साहेब, रात्रीच्यावेळी सभ्य माणसं झोपत असतात. तेच आम्ही करत होतो.’’ मी कसबसे उत्तर दिले. ‘‘तुम्ही डाराडूर झोपायचं आणि आम्हाला कामाला लावायचं, हे शोभतं का तुम्हाला? आळीपाळीनं झोपला असता तर जमलं नसतं का?’’ फौजदारसाहेबांनी दमात घेतलं. ‘‘चुकलं साहेब, पुढच्यावेळी लक्षात ठेवू.’’ खाली मान घालून मी म्हटलं.
‘‘बरं ठीक आहे. समोरच्या हॉटेलमधून चहा-नाश्ता घेऊन या. तक्रारीचं मी बघतो.’’ असं त्यांनी म्हटल्यावर मी पाच जणांचा स्वखर्चाने चहा-नाश्ता घेऊन आलो. त्यानंतर त्यांनी तक्रारअर्ज घेतला. दोन दिवसांनी मी फौजदारसाहेबांबा भेटलो. ‘‘सापडले का चोर?’’ त्यांनी हा प्रश्न विचारल्यावर मी भांबावून गेलो. वास्तविक हा प्रश्न मी विचारणे अपेक्षित होते. मग त्यांनी मला चहा-नाश्ता आणण्यास पिटाळले. पुन्हा दोन दिवसांनी गेल्यानंतर ‘तुमचे चोर’ सांगलीला सापडलेत. त्यांना आणायचा खर्च तुम्हाला करावा लागेल, असे म्हणून त्यांनी पाच हजार घेतले. परत दोन दिवसांनी गेल्यावर सांगलीतील चोर ‘तुमचे’ नाहीत. ‘तुमचे चोर’ नाशिकला पकडलेत, असं सांगितल्यावर मी निमूटपणे पाच हजार त्यांच्या हातावर टेकवले. ‘तुमचे चोर’ या शब्दांची मला गंमत वाटली. त्यानंतरही त्यांनी चहा-नाश्ता आणण्याची जबाबदारी दिली. मी तक्रारदार आहे की वेटर हेच मला कळेनासे झाले. मी तपासाचं काय झालं, हे विचारण्यासाठी खेटा मारत होतो. पण त्यात काही प्रगती होत नसल्याचं मला समजत होतं. चोरीपेक्षा जास्त खर्च पोलिस ठाण्यावर जाऊन झाला होता.
एकदा तर फौजदारसाहेब माझ्यावरच चिडले, ‘‘आम्ही काय चोरांना तुमच्या घराचा पत्ता दिला होता का? चुका तुम्ही करायच्या आणि त्रास आम्हाला द्यायचा, हे बरोबर नाही.’’ असे म्हणून झापलं. त्यानंतर परत पोलिस ठाण्याची पायरी चढायची नाही, असं ठरवलं. त्यामुळंच मी आताच्या चोरीची तक्रार देणार नाही. कार्लेकरांनाही माझी दया आली. तेवढ्यात बेल वाजली. दरवाजात पोलिस पाहून माझी घाबरगुंडी उडाली.
‘‘साहेब! खरंच आमच्या घरी चोरी झाली नाही हो.’’ मी कळवळून म्हटले. ‘‘हे तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये येऊन सांगा.’’ एका पोलिसाने दमात घेत म्हटले. त्यावेळी माझ्यापुढे वेटरची भूमिका पुन्हा नाचू लागली.
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12750 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..