आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही, उरतही नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही, उरतही नाही!
आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही, उरतही नाही!

आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही, उरतही नाही!

sakal_logo
By

‘‘तुमच्या शाळेतील शंभर मुले मी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेत आहे. पदवीधर होईपर्यंत त्यांचा खर्च मी करेन. त्यांची शाळेची फी, गणवेश, वह्या-पुस्तके व इतर खर्चासाठी मी दरवर्षी एक लाख रुपये शाळेकडे जमा करत जाईन. कमी पडले तर अजून देईल पण पैशांअभावी कोणाची शाळा सुटता कामा नये.’’ रणजितने मुख्याध्यापकांना सांगितले आणि एक लाखांचा धनादेश दिला. आपल्या मुलाच्या मनाचा मोठेपणा पाहून मालतीबाईंनाही अभिमान वाटला.
‘‘सर, मी केलेली मदत कोणालाही कळता कामा नये अगदी संबंधित विद्यार्थ्यांनासुद्धा! उजव्या हातानं दिलेलं दान डाव्या हातालाही कळलं नाही पाहिजे तरच ते दान सत्पात्री ठरतं.’’ असं म्हणून रणजितनं मुख्याध्यापकांचा निरोप घेतला व मायलेक दोघेही गाडीत बसले. गाडी ‘मालती ‍भांडी कारखाना’कडे निघाली. गाडीने वेग घेतला आणि रणजितच्या आठवणींनीही फेर धरला. तो तिसरीत असताना रडतच घरी आला. ‘‘आई, उद्यापासून मी शाळेत जाणार नाही. माझ्या फाटक्या कपड्यांना सगळेजण हसतात. त्यातच फी भरली नाही व पुरेशा वह्या नसल्यानं गुरुजी रोज वर्गाबाहेर उभे करतात. मला हा अपमान सहन होत नाही.’’ मुलाचं बोलणं ऐकून मालतीबाईंना वाईट वाटलं. ‘‘पुढच्या आठवड्यात कामाचे पैसे मिळाल्यानंतर आपण कपडे व वह्या घेऊ.’’ त्यावर चिडून रणजित म्हणाला, ‘‘दरवेळी तू असंच बोलतेस आणि काहीच घेत नाहीस. मी आता शाळेत जाणार नाही.’’ त्यावर मालतीबाईही चिडल्या. ‘‘मग काय बापासारखा चोऱ्या करून, रोज दारू पिणार आहेस का?’’ त्यावर रणजित ओरडून म्हणाला, ‘‘होय मी चोऱ्या करेन पण अपमान सहन करणार नाही.’’ त्यावर मात्र मालतीताईंनी काठीनं त्याला बडवलं. नवऱ्याचा सगळा राग त्यांनी मुलावर काढला. रात्री झोपताना रणजितच्या पाठीवरील वळ पाहून त्या कळवळल्या. त्याच्या अंगाला हळदीचा लेप लावून रात्रभर रडत बसल्या. दुसऱ्या दिवशी मालतीबाईंनी मालकीणबाईकडे पदर पसरून दोनशे रुपये अॅडव्हान्स आणले व त्यातून गणवेश व वह्या घेतल्या.
‘‘रणजित, तू शिकावंस म्हणून मी चार घरची धुणीभांडी करते. तुझं आयुष्य मार्गी लागावं, यासाठी माझी सगळी धडपड आहे.’’ असं म्हणून त्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्यानंतर रणजितनेही कशाचा हट्ट धरला नाही. बारावीनंतर तो एका पाटीत भांडी घालून तो दारोदारी विकू लागला. ‘चोरी करताना लाजायचं, कष्ट करताना नाही,’ ही आईची शिकवण त्याने अमलात आणली. कष्ट करतच तो पदवीधर झाला. आईने आयुष्यभर लोकांची भांडी घासली, आपणही काही वर्षे दारोदार जाऊन भांडी विकली. आता आपण भांड्यांचाच कारखाना काढायचा, हे स्वप्न बाळगून तो तशी वाटचाल करू लागला. काही वर्षांनी एका छोट्याशा जागेत भांड्याचा कारखाना काढला. कष्ट व जिद्दीच्या जोरावर पुढील काही वर्षांत त्याने त्याचा मोठा विस्तार केला. कारखान्याला आईचे नाव देऊन, तिच्याविषयीचा आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
गाडी कारखान्यात आल्यावर सुरक्षारक्षकानं दोघांनाही सॅल्यूट मारला. आईला घेऊन रणजित केबिनमध्ये गेला. स्वतःच्या खुर्चीवर आईला बसवले. ‘‘आई, तुझी जागा येथं आहे. तू जर भांडी घासून मला शिकवलं नसतंस, तर भांड्याचा कारखाना काढायचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो नसतो. मी शाळा सोडणार होतो, त्या दिवशी तू मला काठीनं मारलंस, त्यावेळचे पाठीवरील वळ आजही मला योग्य दिशा दाखवतात. लढण्यासाठी ऊर्जा देतात. पैशांअभावी मला ज्या अडचणी आल्या, त्या इतरांना येऊ नयेत म्हणून मी शंभर मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. या मुलांमध्ये मी स्वतःलाच शोधतो.’’ असे म्हणून रणजितने आईला वाकून नमस्कार केला. आपल्या कष्टाचं चीज झालं म्हणून मालतीबाईचा पदर आनंदाश्रूंनी भिजला.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12761 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top