
दरड कोसळण्याची पूर्वसूचना; नागरिकांच्या सभागातून उभारली यंत्रणा ‘सतर्क’च्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहर
पुणे, ता. ७ : राज्यातील नागरिकांच्या सहभागाने डोंगराळ भागात दरड कोसळण्याची पूर्वसूचना देणाऱ्या ‘सतर्क’चे संशोधन ‘लँड’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय संशोधकांनी मोहर उमटली आहे.
माळीण दुर्घटनेनंतर ‘सतर्क’ हा उपक्रमातून सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) संस्थेतर्फे राज्यातील दरडी कोसळण्याच्या घटनांची पूर्वसूचना देण्यात येत आहे. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून त्याचा अभ्यास ‘लँड’ या नियतकालीकेतून प्रसिद्ध झाला आहे.
‘सीसीएस’चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, ‘‘सीसीएस’ आणि अमेरिकेतील ‘टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी’च्या भौतिकशास्त्र विभागातर्फे ‘सतर्क’ने संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर संशोधन सादर केले. यात पुण्यातील नागरिक, हवामान शास्त्रज्ञ आणि भूगर्भ शास्त्रज्ञांनी प्रथमच एकत्र येऊन ही यंत्रणा उभारली.’’
या शोधनिबंधात टेक्सास विद्यापीठातील डॉ. विनय कुमार आणि डॉ. कुलकर्णी या शास्त्रज्ञांसह मयुरेश प्रभुणे, स्नेहा कुलकर्णी, मिताली इनामदार, नितीन ताम्हणकर, स्पंदन वाघमारे, किरण ठोंबरे, परेश म्हेत्रे, तनुजा खटावकर, यशोधन पानसे, अमेय पटवर्धन, योगिनी सोमण, प्रसाद भगत, सुमित भाले आदी ‘सिटीझन सायंटीस्ट’चा सहभाग आहे.
संशोधनात आहे काय?
-सह्याद्री आणि कोकण क्षेत्रामध्ये २००० ते २०१६ पर्यंत ११३ दरडी कोसळल्या
- सह्याद्री, कोकण भागाबरोबरच औरंगाबादमधील डोंगराळ भागातही दरडी कोसळण्याची भीती
- डोंगराळ व मात असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता
- किती पाऊस पडल्यानंतर दरड कोसळण्याची शक्यता असते याचा विभागनिहाय अभ्यास
- पाऊस आणि भूरचनेचा अभ्यास करून दरडी कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला
- त्यापैकी ७६ टक्के अंदाज बरोबर आले असून या विश्लेषणाचा या शोधनिबंधात समावेश
संशोधनाचे वैशिष्ट्ये
‘सतर्क’तर्फे तीन स्तरांची दरडींची पूर्वसूचना देण्याचा देशातील हा पहिला उपक्रम आहे. हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात येणारा अंदाज, रडारवरच्या नोंदी, उपग्रहीय छायाचित्र या आधारावर दरड कोसळण्याची पूर्वसूचना ‘सतर्क’तर्फे देण्यात येते. त्यासाठी राज्यातील दरड कोसळण्याच्या घटनांचा नकाशाही संशोधनातून तयार केला आहे.
हवामानाच्या नोंदी ठेवणे, दरडप्रवण क्षेत्रांमध्ये सर्व्हेक्षण करणे अशा माध्यमातून ‘सतर्क’ यंत्रणा विकसित केली. राज्यात पाऊस होत असताना दरड कोसळण्याची पूर्वसूचना देऊन ती त्या भागातील नागरिकांपर्यंत पोचविण्याचे कार्य यात सहभागी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी केले.
-डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ‘सीसीएस’चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12765 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..