शरद पवार: ‘जीतो कनेक्ट’ परिषदेत ‘प्राइड ऑफ पुणे’ पुरस्कारांचे वितरण जैन समाजाचे कार्य अविस्मरणीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार: ‘जीतो कनेक्ट’ परिषदेत ‘प्राइड ऑफ पुणे’ पुरस्कारांचे वितरण 
जैन समाजाचे कार्य अविस्मरणीय
शरद पवार: ‘जीतो कनेक्ट’ परिषदेत ‘प्राइड ऑफ पुणे’ पुरस्कारांचे वितरण जैन समाजाचे कार्य अविस्मरणीय

शरद पवार: ‘जीतो कनेक्ट’ परिषदेत ‘प्राइड ऑफ पुणे’ पुरस्कारांचे वितरण जैन समाजाचे कार्य अविस्मरणीय

sakal_logo
By

सुधारित
---------------
पुणे, ता. ७ : ‘‘भगवान महावीर यांनी दिलेले शांती व क्षमा हे तत्त्वज्ञान फक्त देशातच नाही, तर विदेशात सुद्धा स्वीकारले गेले याचा गर्व आहे. देशात जेव्हा संकट निर्माण होते, तेव्हा जैन समुदाय समाजाच्या मदतीसाठी धावून जातो. देशासाठी जैन समाजाने केलेले काम आम्ही कधीही विसरू शकत नाही,’’ असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले.

‘जीतो कनेक्ट : २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत शरद पवार यांच्या हस्ते ‘प्राइड ऑफ पुणे’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. याप्रसंगी ‘जीतो कनेक्ट : २०२२’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुख्य प्रायोजक विनोद मांडोत, जीतो अॅपेक्सचे अध्यक्ष गणपतराज चौधरी, जीतो अॅपेक्सचे अध्यक्ष सुरेश मुथा, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जीतो कनेक्टचे समन्वयक राजेश सांकला, रोम झोनचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, रोम जेएटीएफचे अध्यक्ष इंदर जैन, प्रकाश धारिवाल, रवींद्र दगड, अजय मेहता, पंकज कर्नावट, चेतन भंडारी, संचालक इंदर छाजेड, रमेश गांधी, अॅड. एस. के. जैन, विजयकांत कोठारी, देवीचंद जैन आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘देशात माझे अनेक जैन मित्र आहेत. त्यांनी देशासाठी मोठे काम केले आहे. यामध्ये भवरलाल जैन यांनी शेतीसाठी नवे तंत्रज्ञान आणले. पूर्वी बिर्ला, टाटा यांचेच देशात नाव घेतले जात होते. आता माझे मित्र गौतम अदानी हे देशाला पुढे घेऊन जात आहेत. विमानसेवा, आयात-निर्यात आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात काम करत आहेत.’’

जैन समाजातील नवी पिढी प्रशासकीय सेवेत, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात मोठ्या पदावर काम करत आहेत. पण त्याच सोबत देशाच्या प्रगतीसाठी व्यापार-व्यवसायाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.

पवार म्हणाले, ‘‘जैन समाजात चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार केला, पण त्यामध्ये संजय नहार यांचाही सत्कार केला याचाही आनंद वाटला. काश्मिरी मुलांना पुण्यात आणून शिक्षण दिले. सरहद्द, वंदेमातरम संघटनेच्या माध्यमातून देशाच्या एकतेसाठी नहार यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे.’’
या वेळी पुरस्कार विजेत्यांच्यावतीने विजय भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योजक रवींद्र दुगड यांनी प्रास्ताविक केले. राजेश सांकला यांनी पुरस्कारार्थींची ओळख करून दिली.

बाजारपेठ स्थलांतर
केला होता विरोध
पुण्यातील मुख्य बाजारपेठ नाना पेठेत होती. पण तेथील जागा अपुरी पडत असल्याने ही बाजारपेठ गुलटेकडी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यावेळी व्यापाऱ्यांनी विरोध करून दहा दिवस बाजारपेठ बंद ठेवली होती. त्यावेळी ज्येष्ठ व्यापाऱ्यांना सोबत घेऊन चर्चा करून त्यांची समजून काढली. मार्केट यार्ड बाजारपेठ स्थलांतरित झाल्यानंतर पुढील पाच सहा वर्षात येथील व्यवसायात प्रगती झाली. आता याच बाजारपेठेच्या भागात जीतो परिषद होत आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी या वेळी आठवणींना उजाळा दिला.

‘प्राइड ऑफ पुणे’चे मानकरी :
उद्योजक विजय भंडारी, सुधीर मेहता, युवा उद्योजक अतुल चोरडिया, सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्त्या विमल बाफना, ‘सरहद्द’चे संजय नहार, अॅथलेटिक्स खेळाडू प्रियम तातेड.

मार्केटयार्ड, पुणे : ‘जीतो कनेक्ट’ परिषदेत शरद पवार यांच्या हस्ते प्राइड ऑफ पुणे’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी विमल बाफणा, सुधीर मेहता, प्रियम तातेड, विजय भंडारी, पवार,
गणपतराज चौधरी, संजय चोरडिया,विठ्ठल मणियार, संजय नहार,अतुल चोरडिया.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12769 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top