न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न रहेगा बाँस 
न बजेगी बांसुरी
न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी

न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी

sakal_logo
By

मा. मुख्य अभियंता, महावितरण
विषय : सामाजिक सलोख्याबरोबरच समता प्रस्थापित करत असल्याबद्दल आभार मानण्याबाबत.

सर, गेल्या काही दिवसांपासून दररोज दहा-बारा तास वीज गायब होत आहे. याबद्दल आपण कोळसाटंचाईचे कारण देत आहात. मात्र, यामागे सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा तुमचा उद्देश असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भोंग्यामुळे वातावरण तापले आहे. त्यामुळे राज्यात जातीय तेढ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला होता. यातून कसा मार्ग काढायचा, याबाबत वरिष्ठ पातळीवर अनेक बैठका झाल्या. मात्र, फक्त आपल्या महावितरणनेच या कठीण प्रसंगातून मार्ग काढला. कोळसाटंचाईचे कारण देत आपण भारनियमन करण्यास सुरवात केली. त्यासाठी आपण मुख्यतः पहाटे व सायंकाळची वेळ निवडावी, हा काय निव्वळ योगायोग नव्हता. आता वीजच नसल्यामुळे भोंगे वाजण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. त्यामुळे आपोआप जातीय सलोखा निर्माण झाला. दहा-बारा तास वीज नसल्याने सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. मात्र, आपल्या भल्यासाठीच वीज नसते, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे.
सर, गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात दहा ते पंधरा तासांपर्यंत भारनियमन असायचे व शहरी भागात हेच प्रमाण शून्य टक्के असायचे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात विषमतेची दरी निर्माण झाली होती. आम्हालाही शहरी भागाप्रमाणेच सुरळीत वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी अनेक आंदोलने होत. यातून आपण अफलातून मार्ग शोधला आहात. आता ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही दहा-बारा तास भारनियमन असते. यातूनच तुम्ही समतेचा संदेश दिला आहे. शहरी व ग्रामीण हा भेदभाव नष्ट करण्यासाठी तुम्ही उचललेले पाऊल अभिनंदनास पात्र आहे.
जुन्या पारंपरिक व्यवसायांना ‘अच्छे दिन’ यावेत, यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना सलाम आहे. हल्ली वीज नसल्यामुळे कंदील, घासलेटची चिमणी, लामणदिवा, समई, मेणबत्ती, पणत्या, बॅटरी यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे या वस्तू तयार करणारे लघुउद्योजक व कारागीर यांना सुगीचे दिवस आले आहेत. वीज गायब होत असल्यामुळे आणखी एक वर्ग सुखावला आहे, तो म्हणजे चोरमंडळी. रस्त्यावर वा घरात वीज नसल्यामुळे त्यांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायालाही भरभराट आली आहे. या व्यवसायातूनच एका चोराने चारचाकी गाडी खरेदी केली असून, गाडीच्या पाठीमागे ‘महावितरणची कृपा’ असे लिहले असल्याचे समजते.
सर, दुसऱ्या एका गोष्टीसाठी मला आपल्या सहयोगी कंपनीचे कौतुक करावेसे वाटते. हल्ली दुधात, तुपात, अन्नधान्यात, इंधनात सगळीकडेच भेसळ असते. मात्र, विजेमध्ये अजिबात भेसळ नसते. कोणाला खात्री नसेल तर त्यांनी विजेची तार हातात घ्यावी किंवा जिथून वीजपुरवठा सुरु असतो, अशा उपकरणाला हात लावावा. शंका घेणा-याची खात्री पटेल.
सर, सामाजिक सलोखा, समता प्रस्थापित होण्यासाठी तसेच इतरांना रोजगार मिळावा, यासाठी आपल्या कंपनीचे प्रयत्न फार स्तुत्य आहेत, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. नागरिकांनीही आपले योगदान लक्षात घेऊन, सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे, एवढीच अपेक्षा.

ता. क. : वीज नसल्यामुळे डास व उकाड्याने रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही. त्यामुळे दिवसा अनेकांना कार्यालयात वा कंपनीत झोप अनावर होते. त्यामुळे सरकारने कामाच्या ठिकाणी तीन ते चार तास झोपण्यास परवानगी द्यावी किंवा कोणी असे झोपलेले आढळल्यास त्यांच्याकडे सहानुभूतिनं पाहून, कसलीही कारवाई करु नये, ही विनंती.

कळावे,
कशातही सुख व समाधान शोधणारा आपला एक ग्राहक.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12780 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top