
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात आज बैठक
पुणे, ता. ९ : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरू केली आहे. पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात मंगळवारी (ता. १०) मुंबईत बैठक होणार आहे. यास महापालिकेचे दोन उपायुक्त उपस्थित राहणार आहेत.
महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी यास दुजोरा दिला. ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि राज्य सरकारने निवडणुका घेण्याचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होणार असे चित्र निर्माण झाले. दरम्यान पावसाळ्यात महापालिकेच्या निवडणुका शक्य नाही. त्यामुळे त्या सप्टेंबरमध्ये होतील अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या निवडणुका कधी होणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे.
महापालिकेने सहा डिसेंबरला प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. ही प्रभाग रचना नियमांना धरून झालेली नसल्याने निवडणूक आयोगाने २७ ठिकाणी बदल करून हा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हरकती सूचनांनंतर ‘यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांनी त्यांच्या समितीचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरूड, बाणेर, बालेवाडी व हडपसर भागात मोठ्या प्रमाणात बदल सुचविले असल्याची चर्चा आहे. हा अहवाल दिल्यानंतरही अद्याप अंतिम प्रभाग रचना निश्चित झाली नाही, असे असताना मंगळवारी मुंबईत निवडणूक आयोगाने बैठक बोलावली आहे. यामध्ये प्रभाग रचनेतील बदल प्रभाग रचना अंतिम करण्याच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12781 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..