
अंकिता झाली नवऱ्याचा मोबाईल
गेल्या काही वर्षापासून नवऱ्याचं आपल्याकडं सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याची अंकिताची तक्रार होती. आपण काही महत्त्वाचं बोलत असलो तरी त्याचं लक्ष दुसरीकडंच असतं, याचा अनुभवही तिने अनेकदा घेतला होता. खरेदीसाठी आपल्याबरोबर येण्याची त्याची इच्छा नसायची. मारुनमुटकून आला तर आपल्याबरोबर न बोलता दुसरीकडेच तो मन रमवत असायचा. सतत स्वत:च्या विचारात तो हरवून बसायचा. त्यातच लागोपाठ तीन वर्षे तो आपला वाढदिवस विसरल्याने अंकिताच्या अंगाचा तिळपापड झाला होता. यावरुन दोघांमधील कुरबुरीही वाढल्या होत्या.
‘हल्ली माझ्यावरील तुमचं प्रेम कमी होत चाललंय,’ अशा तक्रारी करूनही काही उपयोग होत नव्हता. नवरा आपलं काही ऐकत नाही, असं पाहून तिने देवाचा धावा सुरु केला. कडक व्रतवैकल्ये सुरु केली. त्यामुळे काही दिवसांतच देव प्रसन्न झाला. ‘‘बालिके, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर माग.’’ देवाने म्हटले. प्रत्यक्ष देवच आपल्याशी बोलतोय, हे पाहून तिला आभाळ ठेंगणे वाटू लागले. मग तिने नवऱ्याच्या तक्रारीचा पाढा वाचला.
‘‘बालिके, कोणी भेटलं, अगदी देव जरी भेटला तरी तुम्ही नवऱ्याच्या तक्रारीच सांगता. कधी-कधी वाटतं, नवरा हा प्राणी मी इतका वाईट बनवला आहे का?, याची मला शंका येते. तुला काय हवंय, ते मला नीट आणि सविस्तर सांग म्हणजे मी तसा वर देतो.’’ देवानं असं म्हटल्यावर अंकिताची कळी खुलली. ‘‘देवा, माझ्या नवऱ्याचं सगळं लक्ष माझ्याकडं असलं पाहिजे. मीच त्याचं विश्व पाहिजे. माझ्याभोवती तो सतत घुटमळला पाहिजे, असं काहीतरी कर.’’ अंकिताने आपली अपेक्षा सांगितली.
‘‘मला लागणाऱ्या वस्तू त्याने तातडीने पुरवायला हव्यात. माझी बिले त्याने न कुरकुरता भरली पाहिजेत.’’ अंकिताने म्हटले. ‘‘माझा नवरा मला सोडून कोठेही जाता कामा नये. चुकून त्याने मला सोबत नेले नाही तर माझ्या आठवणीने तो सतत अस्वस्थ राहिला पाहिजे. क्षणोक्षणी त्याला माझी आठवण यायला हवी.’’ अंकिताने म्हटले.
त्यावर देवाने ‘‘आणखी काही हवंय?’’ असं विचारलं. ‘‘माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात माझ्यापेक्षा जास्त काही महत्त्वाचं नकोय. मीच त्याचं आयुष्य व्यापून राहायला हवं. त्याने सतत माझाच विचार करायला हवा.’’ त्यावर देवानं मान डोलवत ‘‘आणखी काही?’’ असं विचारलं.
‘‘मला बघितल्याशिवाय माझ्या नवऱ्याला झोप लागता कामा नये.’’ अंकितानं असं म्हटल्यावर देवानं होकार दिला. ‘‘माझा नवरा सकाळी झोपेतून उठून डोळे उघडेल, त्यावेळी सगळ्यात पहिलं त्यानं मला बघायला हवं.’’ अंकितानं अपेक्षा व्यक्त केली. ‘‘मी सोडून नवऱ्याची नजर कोठेही जाता कामा नये. माझ्याकडे त्याचे सतत लक्ष पाहिजे. काही मिनिटे जरी मी त्याला दिसले नाही तर तो कासावीस झाला पाहिजे.’’ अंकिताने आपल्या अपेक्षा
देवाकडे व्यक्त केल्या.
‘‘अजून काही राहिलंय का?’’ देवानं विचारलं. ‘‘आता शेवटचं. मला साधं खरचटलं तरी त्याच्या वेदना माझ्या नवऱ्याला झाल्या पाहिजेत.’’ अंकिताच्या सगळ्या मागण्या ऐकून, देवाने ‘तथास्तू’ म्हटले आणि दुसऱ्याच क्षणी अंकिता तिच्या नवऱ्याचा मोबाईल झाली. तिने देवाकडे केलेल्या सर्व मागण्या आता पूर्ण झाल्या आहेत. तथास्तु !
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12935 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..