
महिलेच्या सुरक्षेसाठी थांबली ‘पीएमपी’!
पुणे, ता. १५ ः पीएमपीच्या बसमधून मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता कात्रज -कोंढवा रस्त्यावरील राजस सोसायटीच्या थांब्याजवळ पोहचलेल्या महिला प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यावर वाहक व चालकाने पीएमपी जाग्यावरच थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माजी नगरसेवकाने महिला प्रवाशाला इच्छितस्थळी पोहचवले.
सासवड - कात्रज बस रात्री १० वाजून ४५ मिनीटांनी सासवडमधून सुटली. या बसमध्ये एकमेव महिला प्रवासी होत्या. पंचविशीतील या महिलेसोबत बाळ आणि चार बॅग होत्या. महिलेला सोडायला आलेल्या पतीने पीएमपीचे चालक अरुण दसवडकर व वाहक नागनाथ ननवरे यांना पत्नीला सुखरूप सोडण्याची विनंती केली. रात्री पावणे बाराच्या सुमारास राजस सोसायटीचा थांबा आला आणि महिला खाली उतरली तेव्हा तिला घेण्यास कुणीच आले नव्हते. घेण्यासाठी येणारा दीर तिथे पोहचला नव्हता, तसेच त्याचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे महिला तणावात आली. यापरिस्थितीत त्या महिलेच्या सुरक्षेचा विचार करून चालक व वाहकांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. बस रस्त्याच्या कडेला घेतली. बसच्या दोन्ही लाइटच सुरू केल्या. तिच्या पतीला फोन केला, पण त्यांची दुचाकी पंक्चर झालेली असल्याने तातडीने पोहचणे शक्य नव्हते. जोपर्यंत महिलेला घेण्यास कोणीतरी येणार नाही, तो पर्यंत पुढे न जाण्याचा निर्णय चालक- वाहकांनी घेतला. ते तसेच थांबून होते. सुमारे वीस मिनिटांनंतर माजी नगरसेवक वसंत मोरे तिथे आले. त्यांना परिस्थिती समजल्यावर त्या महिलेला सुरक्षितपणे त्यांनी आपल्या वाहनातून घरी सोडले.
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12951 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..