
लेकी बोले, सुने लागे सुने बोले, कोणा लागे?
प्रिय आई, सप्रेम नमस्कार!
लग्न होऊन, सासरी नांदायला आले, या गोष्टीला आता आठवडा झाला आहे. या काळात मला सासर आणि माहेर यात ‘काडी’चाही फरक जाणवला नाही. फक्त सासूबाई हळू आवाजात ‘मी काडी काडी जमवून संसार केला आणि सूनबाई ‘काडी’चंही काम करत नाही,’ असं कोणालातरी सांगत असल्याचं मी एक-दोनदा ऐकलं.
आमच्या नव्या संसारात ‘काड्या’ घालायचं काम करुन, त्यांना काय मिळणार आहेस, कोणास ठाऊक? पण तू सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. काहीही न बोलता, बेचव स्वयंपाक करुनच मी माझा राग व्यक्त करत असते. ही गोष्टही माझ्या पथ्यावर पडू लागली आहे. तेव्हापासून सासूबाई मला किचनमध्ये येऊ देत नाहीत. आई, मला स्वयंपाक करता येत नाही, असं पाहून त्यांनी एकदा भांड्यांचा पसारा माझ्या पुढ्यात ठेवला. मग मी भांडी घासत असल्याचा सेल्फी काढला व आमच्या फॅमिली ग्रुपवर टाकला. ‘नवी नवरी असली म्हणून काय झालं? भांडी घासणं, हे स्रीचं आद्यकर्तव्य आहे’ अशी पोस्ट टाकली. त्यावर माझ्या नणंदेचा लगेच सासूबाईंना फोन आला व सासूबाईंनी लगेचच माझ्या पुढ्यातला भांड्यांचा पसारा काढून घेतला. ‘मी घासते’ असं मी म्हणूनही त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. सध्या आमच्याकडं भांडी घासायला बाई आहे. एका गरीब महिलेला मी रोजगार मिळवून दिला, याचं मला फार समाधान आहे. त्यानंतर दोन दिवसांनी सासूबाईंनी मला कपडे धुवायला सांगितले पण बाथरुममध्ये जाण्यापूर्वी मी कपडे धुतानाचा सेल्फी काढू नये म्हणून माझा मोबाईल ताब्यात घेतला. बाथरुममध्ये गेल्यावर मी कपड्यांना साबण लावला व कपडे न पिळताच वाळत घातले. कोणाचीही ‘पिळवणूक’ माझ्या डोळ्यांना सहन होत नाही. मग ते कपडे असले म्हणून काय झालं? दहा-पंधरा मिनिटांत कपड्यांना साबण तसाच ठेवलाय, असे म्हणत सासूबाई ओरडत आल्या. मग त्यांनी सगळे कपडे परत धुतले. तेव्हापासून त्यांनी कपडे धुण्याचेही काम माझ्याकडून काढून घेतले. त्यावेळी मला फार वाईट वाटलं. घरातील सगळी कामं सासूबाई करत असल्यानं, त्यांचं अंग दुखते. त्यामुळे तुमचं अंग दाबून देते, असं मी म्हटलं. त्यानंतर हात-पाय दाबल्यानंतर मी त्यांचा गळाही दाबला. त्यावेळी त्या फार घाबरल्या. तेव्हापासून मला त्या जवळही येऊ देत नाहीत. यात माझं काय चुकलं? आई, माझ्या सासूला घड्याळही अजिबात कळत नाही. सकाळी मला अंथरुणातून उठवून ‘सूनबाई, ऊठ बाई! घड्याळात बघ किती वाजलेत?’ असं विचारतात. मग मी झोपेतून उठून घड्याळात बघते व जितके वाजले असतील, ते सांगते. दररोज असं होऊ लागल्याने माझी झोपमोड होऊ लागली आहे. त्यामुळे मी सासूबाईंना घड्याळ शिकवायचे ठरवले आहे.
आई, सासूबाई मला घरात काडीचंही काम करू देत नाहीत. मग मी दिवसभर करायचे काय? त्यामुळे दिवसातून मी तीन-चार तास तुझ्याशी फोनवर बोलत असते. हेदेखील सासूबाईंना बघवत नाही. ‘रोज रोज तेच तेच बोलायचा कंटाळा कसा येत नाही’ असं टोमणे त्या सारखे मारत असतात. आईशी फोनवर बोलू देत नाही ना मग आईलाच सहा महिन्यांसाठी इकडे बोलावून घेते, असं सासूबाईंना म्हणताच त्या एकदम कावऱ्याबावऱ्या झाल्या. ‘अगं आईशी चार-पाच तास बोललीस तरी चालेल,’ असं म्हणून त्यांनी मोठ्या मनाने परवानगी दिली आहे.
ता. क. : आई, मी सासरी एकदम सुखात आहे. पण नव्या नवरीचे नऊ दिवस संपल्यानंतर हेच दिवस पुढे कायम राहतील ना? त्यासाठी तुझ्या मार्गदर्शनाची मला फार गरज आहे.
कळावे,
तुझी आज्ञाधारक मुलगी,
सुजाता.
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13047 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..